केंद्राच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार
By admin | Published: January 22, 2015 12:00 AM2015-01-22T00:00:48+5:302015-01-22T00:00:48+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सामान्य जनतेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे.
अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सामान्य जनतेला याचा परिणाम सहन करावा लागत आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणाविरोधात बुधवारी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यामार्फत शासनाला पाठविण्यात आले आहे.
विविध अस्मानी संकटांनी शेतकरी उद्ध्वस्त झाल्यामुळे राज्य शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी २५ हजार तर ओलिताच्या शेतीकरिता ५० हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ जमा करावी. संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांप्रती उदासीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच पेट्रोल व डिझेलचे दर काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात कमी झाले होते व यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमती व भारतातील पेट्रोल पदार्थाची तुलना करणारे तक्ते पाहिले असता सध्या पेट्रोलिंग कंपन्या सामान्य ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे हा काळाबाजार थांबवावा, मोदी शासनाने नवीन केंद्रीय भूमी अधिग्रहण अध्यादेश हा कायदा लादून शेतकरीविरोधी षड्यंत्र रचले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता थेट मोठमोठ्या उद्योगपतींना देण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा, मुस्लिम समाजाला काँग्रेस सरकारने पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र भाजप सरकारने तो रद्द करुन मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, नगरसेविका वंदना कंगाले, दिव्या सिसोदे, मालती दाभाडे, कांचन ग्रेसपुंजे, दीपक गुल्हाने, नूतन भुजाडे, मतीन अहमद, मजर अली उपस्थित होते. (प्रतिनिधी)