गांधीजींच्या चरख्याला आले मूर्तस्वरूप
By admin | Published: September 1, 2015 12:01 AM2015-09-01T00:01:43+5:302015-09-01T00:01:43+5:30
राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी चरख्यावर गृहउद्योग निर्माण करणारी संकल्पना मांडली होती.
जिल्हा खादी ग्रामोद्योगचा उपक्रम : राज्यात प्रथमच अमरावतीत प्रयोग
अमरावती : राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी चरख्यावर गृहउद्योग निर्माण करणारी संकल्पना मांडली होती. त्याच चरख्याला आज आधुनिकीकरणाची जोड देऊन सोलर चरखे तयार करण्यात आले असून गांधीजींच्या चरख्याला आज मूर्तस्वरुप आले आहे. जिल्हा खादी ग्रामोद्योगाच्या उपक्रमात जिल्ह्यात २२ गावांतील २२० महिलांची निवड करण्यात आली असून त्या माध्यमातून शेतकरी महिलांना उद्योगाची नवीन दिशा मिळाली आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातून प्रथमच जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उद्योजकांची बैठक घेऊन अमरावतीच्या टेक्सस्टाईल झोनमध्ये उद्योग उभारणीवर चर्चा केली. त्यावेळी गडकरी यांनी सोलर चरख्यातून गृहउद्योगाची घोषणा केली होती. तो उपक्रम खादी गामोद्योग महामंडळाने हाती घेतला असून रविवारी बचत भवनात महिलांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस कंपन्यांकडे पाठविण्यात येत होता. मात्र, आता सोलर चरख्यातून कच्चा मालाचा पक्का माल गृहउद्योगातूनच महिला तयार करणार आहे. जिल्ह्यातील महिलांना घरबसल्या गृहउद्योग येईल.
- प्रदीप चेचरे, खादी ग्रामोद्योग अधिकारी, अमरावती.
गांधींनी वर्धेतून सुरू केली होती मोहीम
महात्मा गांधींनी १९१५ साली गुजरातमधील एका खेड्यात चरखा पाहिला होता. तेव्हा गांधींनी महाराष्ट्रातील वर्धेतून चरख्याची मोहीम सुरु केली होती. त्यावेळी गांधीची चरख्याचा प्रसार व प्रचार केला. तेव्हा चरखा देशभरातील गावागावामध्ये पोहचला होता. आज मूर्तस्वरूप देण्याचे कार्य अमरावतीमधील खादी ग्रामोद्योगने केले आहे.
२३ वा गट तयार
खादी ग्रामोद्योगामार्फत सोलर चरख्यातून महिलांचा गृहउद्योग करू शकणार आहे. त्याकरिता २२ गट तयार करून महिलांना कर्ज वाटप करण्यात येणार आहेत. कच्चा माल व पक्यां मालाची विक्री करण्यासाठी २३ गटांची निर्मीती करण्यात आली असून या सर्व गटांवर खादी ग्रामोद्योग देखरेख करणार आहे.
२२ गावांची निवड
अमरावती : स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित माल तयार करून येथेच उद्योग सुरू करावेत, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली होती. ही बाब हेरून जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी वर्धेतील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिककीरण संस्थेला भेट दिली.
संस्थेने तयार केलेल्या सौर ऊर्जेवरील चरख्यांची पाहणी चेचरे यांनी करुन तेथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सोलर चरख्यांच्या संकल्पनेतून अमरावती जिल्ह्यातील महिलांना गृहउद्योगातून चालना मिळण्याचे संकेत प्रदीप चेचरे यांना दिसले. त्यामुळे चेचरे यांनी सोलर चरख्याबाबत नितीन गडकरी व उद्योगमंत्री यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. त्यानंतर हा उपक्रम जिल्हा खादी ग्रामोद्योगाकडे आला.
खादी ग्रामोद्योग केंद्राने जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी ११ तालुक्यांतील प्रत्येकी दोन अशा २२ गावांची निवड करण्यात आली.
आमदार व खासदारांनी आदर्श ग्राम दत्तक योजना राबविलेल्या गावांना प्राधान्य देऊन २२० महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांना ५० हजारांचे वैयक्तिक कर्ज देण्यात येत येणार आहे.
त्याकरिता खादी ग्रामोद्योग केंद्राने महिलांच्या कर्जाचे प्रारूप संबंधित बँकांंकडे पाठविले आहे. त्यामध्ये १० हजारांचे अनुदान खादी महामंडळ देणार आहे.
हा उपक्रम राबविताना एका गावातील १० महिलांना एकाच शेडखाली काम करावे लागणार आहे. या महिलांना वर्धेतील संस्थेमार्फत प्रशिक्षणसुध्दा देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)