जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज
By admin | Published: April 13, 2017 12:16 AM2017-04-13T00:16:01+5:302017-04-13T00:16:01+5:30
तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे.
वीरेंद्र जगताप : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
चांदूर रेल्वे : तालुक्यात चिरोडी व पोहरा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, अवैध वनकटाई, मेंढपाळाचा हैदोस, काठेवाड्यांच्या वनचराईमुळे जंगलाचे मोठे नुकसान होत आहे. जंगले उजाड झाली तर त्याचा सरळ फटका पावसाला बसतो. पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जंगलांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले.
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चांदूररेल्वेचे नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, चांदूरेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, अमरावतीचे सहायक वनसंरक्षक (कॅम्पा व वन्यजीव) आर.जी.बोंडे, सहायक वनसंरक्षक ए.डब्ल्यू.कविटकर, चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे पिंपळाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, जंगली प्राणी शेतात शिरल्यामुळे त्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून उत्पादनात देखील घट आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी हे कारण देखील असू शकते. त्यामुळे आत्महत्येच्या याकारणांचा समावेश करायला हवा. उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनंत गावंडे, संचालन सदानंद पाचंगे तर आभार प्रसाद वाकोडे यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. वन्यपशुंचा उच्छाद रोखण्यासाठी आवश्यक ती पाऊले तातडीने उचलण्यात यावी, अशी भूमिका मांडण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)