कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच नवीन वर्षात कॉलेज होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:29+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बॅकलॉग, वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल, असे संकेत आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २० डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा ‘पीक पीरियड’ ओसरला असला तरी हा विषाणू अजूनही गेलेला नाही. त्यातच २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना मुलांची अत्यल्प हजेरी आहे. पालकांची शाळांना ‘ना’ आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालये नवीन वर्षातच उघडून शैक्षणिक सत्रारंभ व्हावा, असा सूर प्राचार्य, प्राध्यापकांचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांनी अद्यापही काही विद्यापीठांकडून परीक्षा आणि निकाल जाहीर व्हायचे आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बॅकलॉग, वंचित विद्यार्थ्यांच्या परीक्षा व निकालाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल, असे संकेत आहेत. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २० डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातच कॉलेज सुरू होतील, असे चित्र आहे. जानेवारीत कॉलेज सुरू करणे योग्य
कोरोनावरील लस अजूनही आलेली नाही. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाचा प्रभाव कमी होण्याचे संकेत आराेग्य प्रशासनाने दिले आहेत. अंतिम वर्ष, बॅकलॉग परीक्षांचे निकाल बाकी आहेत. नवीन वर्षातच महाविद्यालये सुरू करणे योग्य राहील, असे प्राचार्य फोरमचे अध्यक्ष आर.डी. सिकची म्हणाले.
कोरोनाची स्थिती बघूनच कॉलेज सुरू व्हावे
काही महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान नाही, तर काहींना अनुदान नाही. त्यामुळे कोविडबाबत ही महाविद्यालये मुलांची दक्षता कशी घेतील, हा प्रश्न आहे. कोरोनाची स्थिती बघूनच जानेवारीत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असे ‘नुटा’चे सहसचिव सतेश्वर मोरे यांनी सांगितले.