रेल्वेत कॉलेज बॅगमधून दारू अन् गुटख्याची खेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:23 PM2019-01-09T22:23:21+5:302019-01-09T22:23:51+5:30
रेल्वेत कॉलेज बॅगची तपासणी होत नाही. याचा नेमका फायदा घेत नवख्या युवकांकडून कॉलेज बॅगमधून दारू आणि गुटखा तस्करी चालविली आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बडनेरा येथून हा माल रेल्वेने जातो. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वेत कॉलेज बॅगची तपासणी होत नाही. याचा नेमका फायदा घेत नवख्या युवकांकडून कॉलेज बॅगमधून दारू आणि गुटखा तस्करी चालविली आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बडनेरा येथून हा माल रेल्वेने जातो. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.
रेल्वेच्या धावत्या गाड्यांमध्ये अवैध दारू, गुटखा तस्करीसाठी रेल्वे गाड्यातून १८ ते ३० वयोगटातील युवकांचा वापर केला जात आहे. कॉलेजचे विद्यार्थी असणार, अशी या युवकांची राहणीमान आहे. पुलगाव, वर्धा असे दिवसातून दोन ते तीनवेळा दारू, गुटखा तस्करीसाठी कॉलेज बॅगचा वापर करतात. काही धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये कॉलेज बॅगमधून गुटखा विक्री करीत आहे. ऐरवी ते कॉलेजचे विद्यार्थी भासतात. परंतु, कॉलेज बॅगमधून युवक दारू, गुटख्याची तस्करी करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. दारू विक्रेत्यांनी या युवकांना रेल्वे प्रवासासाठी महिनाभराचे तिकीट काढून दिले आहे. पाठीवर कॉलेज बॅग टाकून ते मोहीम फत्ते करतात. दारू, गुटखा तस्करीसाठी युवकांना विशेष रक्कम दिली जाते. बडनेरा ते पुलगाव, वर्धा असा दारू तस्करीचा मार्ग या युवकांनी निवडला आहे. यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल कोणत्याही उपाययोजना करीत नाही.
रेल्वेच्या पॅन्ट्रीकारमध्ये मिळते दारू
धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये जेवण, शीतपेय, खाद्यपदार्थ पुरवठा करणारी यंत्रणा म्हणजे पॅन्ट्रीकार (स्वतंत्र डबा) आहे. मात्र, धावत्या गाड्यात जेवण पुरवठा करणाऱ्या कर्मचाºयांकडे प्रवाशांनी कोणत्याही ब्रॅन्डच्या दारूची मागणी केली. ती सहजतेने उपलब्ध होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याकरिता प्रवाशांना जास्त रक्कम मोजावी लागते. बरेचदा हे कर्मचारी स्वत:हून प्रवाशांना वाईन हवी का, अशी विचारणा करतात. पॅन्ट्रीकारमध्ये दारू विक्री व्यवसाय फोफावला आहे.
धावत्या गाड्यांत कॉलेज बॅगमधून दारू, गुटखा तस्करी होत असताना अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. मात्र, त्याअनुषंगाने संशयास्पद युवकांकडील कॉलज बॅगची तपासणी करून दारू तस्करीबाबत उलगडा केला जाईल. तशा सूचना आरपीएफ जवानांना दिल्या जातील.
- राजेश बढे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल बडनेरा