महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट पूर्वनियोजित; ॲड. यशोमती ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 07:00 AM2021-11-19T07:00:00+5:302021-11-19T07:00:12+5:30
Amravati News अमरावती शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
अमरावती : शहरात १२ आणि १३ नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा दावा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरवादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला, असे सायबर विभागाच्या अहवालावरून दिसून येते. कारण यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल, हे स्पष्टच आहे, अशी पुस्तीही ठाकूर यांनी जोडली.
दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार १२ व १३ नोव्हेंबरला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरून अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आले तसेच ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केलेल्या पोस्ट या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या, तर त्यासोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या. त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात, अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा, यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता, असा दावा पालकमंत्री ठाकूर यांनी केला आहे.
घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरीत्या समावेश होता तसेच या माध्यमातून नेमका कुणाला फायदा होणार, हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सामाजिक एकोपा व शांतता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.