एक हजाराची लाच घेताना हवालदाराला अटक
By Admin | Published: January 16, 2016 12:25 AM2016-01-16T00:25:33+5:302016-01-16T00:25:33+5:30
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना सरमसपुरा पोलीस ठाण्यातील हवालदाराला शुक्रवारी एका शीतपेयाच्या दुकानात लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ...
लाचखोरी : तंटामुक्तीच्या अध्यक्षालाच मागितली लाच
परतवाडा : तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना सरमसपुरा पोलीस ठाण्यातील हवालदाराला शुक्रवारी एका शीतपेयाच्या दुकानात लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
भरत बन्सीराम तंतरपाळे (४९, रा. सरमसपुरा पोलीस स्टेशन) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाविरूध्द पोलीस स्टेशनमध्ये अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. त्याचा समझोता करण्यासाठी हवालदार भरत तंतरपाळे याने दोन हजार रुपयांची लाच संबंधित अध्यक्षाला मागितली होती व त्या बदल्यात प्रकरणाचा निपटारा कमी करण्याची हमी दिली होती. त्याप्रकरणी एक हजार रुपयांमध्ये समझोता झाला. शुक्रवारी ही रक्कम पोलीस स्टेशन पुढील एका शीतपेयाच्या दुकानात देण्याचे ठरले. तशी माहिती तक्रारकर्त्याने लाचलुचपत खात्याला दिली असता सापळा रचण्यात आला. त्यामध्ये संबंधितांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना भरत तंतरपाळे याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक ए.डी. चिमोटे, अमरावती परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनात घटकप्रमुख आर.बी.मुळे, निरीक्षक राजवंत आठवले, भातकुले, सानप, वाडेकर, धानोरकर, ठाकूर, ताहेर, बिरोले, अकबर खान, जाकीर खान यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)