सततची नापिकी अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, हताश शेतकऱ्यानं संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 02:19 PM2023-03-09T14:19:40+5:302023-03-09T14:52:15+5:30

वरखेड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Constant barrenness and a mountain of debt on his head, the farmer ended his life | सततची नापिकी अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, हताश शेतकऱ्यानं संपवलं जीवन

सततची नापिकी अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, हताश शेतकऱ्यानं संपवलं जीवन

googlenewsNext

तिवसा (अमरावती) : कर्ज व सततची नापिकी, सोबतच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतीचे अतोनात नुकसान अशा एक ना अनेक संकटांना कंटाळून तालुक्यातील वरखेड येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने घरासमोरील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

अशोक महादेव आमले (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कुटुंबप्रमुख असलेल्या अशोक आमले यांच्यावर वृद्ध वडिलांसह पत्नी व दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. शेतीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. अशातच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली. त्यामुळे पदरात काहीच पडले नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गेल्या काही दिवसांपासून ते गावातच हातगाडीवर अंडी विकून कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करायचे.

कुटुंबप्रमुखाचे छत्र हरवल्याने आमले कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे वरखेड मंडळातील सर्वाधिक नुकसान झाले होते. शासनाकडून अद्यापही येथील शेतकऱ्यांना दमडी मिळाली नाही. शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन, उपोषण, रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोरड्या आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

Web Title: Constant barrenness and a mountain of debt on his head, the farmer ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.