गाविलगड किल्ला परिसरात चेकडॅम बांधा
By Admin | Published: November 4, 2015 12:12 AM2015-11-04T00:12:10+5:302015-11-04T00:12:10+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी सकाळी चिखलदऱ्यातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची पाहणी केली.
राज्यपालांनी केली पाहणी : पुरातत्त्व विभागाने पुरविली माहिती
चिखलदरा : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी सकाळी चिखलदऱ्यातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षक श्रीमती नंदिनी भट्टाचार्य, सहायक अभियंता मोहम्मद सलाऊद्दीन, पुरातत्त्व विभागाच्या नागपूर मंडळाचे प्रमुख मिलिंद अंगाईतकर, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, विभागीय वनाधिकारी युवराज, उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, तहसीलदार सुरडकर, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार आदी उपस्थित होते.
गाविलगड किल्ला हा संरक्षित स्मारक असून प्राचीन स्मारकाने पुरातत्वीय स्थळ व अवशेष अधिनियम १९५८ च्या २४ व्या कलमान्वये हे स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गाविलगड किल्ला संरक्षणाच्यादृष्टीने मजबूत, सहज माऱ्याची जागा नसल्यामुळे सर करण्यास अवघड म्हणून प्रसिध्द होता. विदर्भाच्या इतिहासात गाविलगड अजरामर आहे. या किल्ल्याचे मूळ बांधकाम येथील गवळी राजाने (यादवाने) सर्वप्रथम इ.स १२ व्या शतकात केले. सन १४२५ मध्ये मुलकी आणि लष्करी या दोन्ही उद्देशाने परिपूर्ण असा सुसज्ज किल्ला बांधला आहे, अशी माहिती यावेळी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यपाल यांना दिली. राज्यपालांनी दुर्बिणीद्वारे दिल्ली गेट, मशिद, तोफ, बुरूज व परकोटाची पाहणी केली. यावेळी राज्यपालांनी पहाडावर पडणारे पाणी जमिनीत मुरण्याच्यादृष्टीने ‘चेकडॅम’ बांधण्याच्या सूचना दिल्यात. (तालुका प्रतिनिधी)
आदिवासींना कॉफी लागवडीचे प्रशिक्षण द्या
याचवेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चिखलदरा परिसरातील मरीयमपूर येथे सकाळी रोमन कॅथॅलिक मिशनच्या कॉफी लागवडीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यांसमवेत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू रविप्रकाश दाणी, मिशनचे बिशप घोन्सालवीस, फादर जॉन मॅथ्यू, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंह, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, तहसीलदार सुरडकर आदी उपस्थित होते. मिशन व प्रशासनाच्या समन्वयाने कॉफी लागवडीची शास्त्रीय माहिती देणारे १०० प्रशिक्षित तज्ज्ञ तयार करण्याचे निर्देश यावेळी महामहिम राज्यपालांनी दिलेत. या प्रशिक्षकांच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासीं शेतकऱ्यांना कॉफी लागवडीची माहिती देण्याच्या सूचना त्यांनी केल्यात.