क्रॉसिंगवर बांधकाम, पर्यायी व्यवस्था कुठाय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:46 AM2018-01-19T00:46:11+5:302018-01-19T00:46:31+5:30
उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी राजापेठ क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी या भागातून ये-जा करणाºया नागरिकांनी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न बसप गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी राजापेठ क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी या भागातून ये-जा करणाºया नागरिकांनी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न बसप गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला आहे. राजापेठ उड्डणपुलाबाबतचा प्रस्ताव क्रमांक ८७ हा १९ जानेवारीच्या आमसभेत प्राधान्याने घेण्यात यावा, असे पत्र पवार यांनी महापौर संजय नरवणे यांना दिले आहे.
बांधकामासाठी रेल्वे फाटक बंद करण्यापूर्वी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबत सूचना काढणे, ती माध्यमांद्व्रारे प्रकाशित करणे अभिप्रेत असताना, महापालिका प्रशासनाने मौन धारण केले आहे. रेल्वे फाटकालगत किती दिवस काम सुरू राहणार, त्यासाठी हा मार्ग किती दिवस बंद ठेवण्यात येईल, याची माहिती महापालिका प्रशासनाने सर्व नागरिकांसोबतच नगरसेवकांना द्यावी, या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव प्राधान्याने घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली आहे. शुक्रवारच्या आमसभेत या विषयावर खडाजंगी चर्चा अपेक्षित असून याबाबत अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांना उत्तर द्यावे लागणार आहे.
ये-जा करायची कुठून?
राजापेठ उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान रेल्वे फाटकालगत काम सुरू करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती जीवन सदार यांनी दिली आहे. मोतीनगर, कल्याणनगर, यशोदानगर, दस्तुरनगर, कंवरनगरकडून येणारे नागरिक राजकमल वा बडनेरा रस्त्यावर जात असताना या रेल्वे फाटकाच्या क्रॉसिंग मार्गाचा अवलंब करतात. हा मार्गच बंद केल्यास त्यांची पर्यायी व्यवस्था काय, हे महापालिकेने प्रथम स्पष्ट करावे, असे आग्रही मत चेतन पवार यांनी मांडले आहे.