बांधकाम सदोष, अनावश्यक पिलर्स हटवा
By admin | Published: June 16, 2017 12:10 AM2017-06-16T00:10:06+5:302017-06-16T00:10:06+5:30
श्री अंबादेवी संस्थान सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत अंबानाल्यावर बांधण्यात आलेले काही अनावश्यक पिलर्स
व्हीएनआयटीची सूचना : अंबादेवी-एकवीरा देवी संस्थान सौंदर्यीकरण प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्री अंबादेवी संस्थान सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत अंबानाल्यावर बांधण्यात आलेले काही अनावश्यक पिलर्स हटविण्याची सूचना ‘व्हीएनआयटी’ने दिली आहे. सोबतच नाल्यामधील कचरा गाळ काढण्याची सूचनाही व्हीएनआयटीच्या ‘अप्लाईड मेकॅनिक्स’ विभागाने दिलेल्या तांत्रिक मतांमध्ये केली आहे.
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी १५ मे २०१७ला व्हीएनआयटीला पत्र लिहून त्यांचेकडून अंबा व एकवीरा देवी संस्थानच्या बांधकाम प्रकल्पाबाबत टेक्निकल ओपिनियन मागितले होते. या परिसरातील अंबानाल्यात चुकीचे पिलर टाकल्याने त्या पिलरला केरकचरा अडतो व पावसाळ्यात पुरसदृश परिस्थिती उद्भवत असल्याचा मुख्य आक्षेप आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने नागपूरस्थित व्हीएनआयटीशी पत्रव्यवहार केला होता. २७ मे रोजी व्हीएनआयटीच्या आर.के. इंगळे आणि जी.एन. रोंघे या दोन प्राध्यापकांनी अंबानाल्यावरील बांधकामासह अन्य बाबींची तपासणी केली. त्याबाबत सर्वंकष अहवाल बुधवारी महापालिकेला प्राप्त झाला आहे.
अंबानाला आणि त्यावरील संपूर्ण बांधकामाचे निरीक्षण केल्यानंतर हे उभय प्राध्यापकांनी ठोस निष्कर्ष काढले आहेत. त्या निष्कर्षाच्या आधारे पुलाच्या दोन्ही बाजूने खुल्या असलेल्या नाल्यात बांधलेले सिमेंट पिलर काढण्याची सूचना महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय नाल्यातील कचरा अडू नये, यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्यात. नाल्यातील पावसाचे पाणी आणि कचनरा वाहून जाण्यासाठी किमान या भागात साचलेला कचरा प्राधान्याने काढण्याच्या सूचना व्हीएनआयटीने दिल्या आहेत. याशिवाय नाल्याच्या तळाला ‘आरसीसी’ फ्लोरिंंग करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसे केल्यास पुराचे पाणी त्वरित निचरा होईल, असे मत व्हीएनआयटीने मांडले आहे. एकंदरितच व्हीएनआयटीने अनौपचारिकरीत्या अंबानाल्यावरील बांधकामाला सदोष असे म्हटले आहे.
कॉलमच्या पुनर्बांधणीची सूचना
अंबानाल्यातील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी स्लॅब बीम कॉलम काढून टाका आणि नव्याने बांधकाम करण्याची महत्त्वपूर्ण सूचना व्हीएनआयटीने केली आहे. परिणामकारक उपाययोजना राबविणे शक्य असेल तर या मोठ्या परिसरातील कामाचे पुनर्बांधणी करण्याचा सल्ला महापालिकेला देण्यात आला आहे. अंबानाल्यावरील बांधकामाच्या सदोषतेवर औपचारिक ठपका न ठेवता व्हीएनआयटीने पिलर हटविण्यासह परिणामकारक उपाययोजना सुचविल्या आहेत. अनौपचारिकरीत्या व्हीएनआयअीने हे बांधकाम सदोष ठरविले आहे.