बांधकाम विभाग ‘बेवारस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:34 PM2018-06-24T22:34:31+5:302018-06-24T22:35:08+5:30
महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही.
शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ या तीनही महत्त्पूर्ण पदांचा कार्यभार सेवानिवृत्त अभियंता अनंत पोतदार यांच्याकडे देण्यात आला आहे. ते मागील आठवड्यात रजेवर गेल्याने बांधकाम विभागातील बहुतांश कामे रखडली आहेत. बांधकाम व अन्य बाबतीतल्या साºया योजनांचे कार्यान्वयन शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ कडे आहे. तूर्तास नगरोत्थान, डीपीसीतून मिळालेल्या ७.३६ कोटीच्या कामांसह राजापेठ उड्डाणपूल, छत्रीतलाव, ट्रान्सपोर्टनगर व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. आरोग्य, नगररचना, कर या विभागांसोबतच बांधकाम विभागाचे महत्त्व सर्वाधिक आहे. मात्र, मागील साडेतीन वर्षांपासून या महत्त्वपूर्ण विभागाला कंत्राटीचे ग्रहण लागले आहे. तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांचे सेवानिवृत्त अभियंता जीवन सदार यांच्यावर अधिक जीव असल्याने मागील तीन वर्षात गहरवार, संतोष जाधव, सोनवणे व पवार हे चार अभियंते महापालिकेतून परत गेले. ज्यांना बेकायदा नियुक्ती दिली, त्या सदारांचा कंत्राटी कार्यकाळही जूनमध्ये संपला. त्यानंतरही पूर्णवेळ प्रतिनियुक्तीचा शहर अभियंता महापालिकेला न मिळाल्याने पुन्हा ते पद कंत्राटी पोतदारांकडे देण्यात आले. पोतदारांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. अनेक उपअभियंते, सहायक अभियंते व कर्मचारी शोधूनही बांधकाम विभागात सापडत नाहीत. एकंदर मागील तीन वर्षांत प्रतिनियुक्तीवर अभियंता नसल्याने बांधकाम विभागाची रया गेली आहे.
नव्या आयुक्तांकडून हवा पाठपुरावा
सदारांच्या कंत्राटी कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कार्यकारी अभियंता महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले. मात्र, सदार स्थानापन्न असल्याने पवारांनी त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता-२ पदभार दिला. शहर अभियंता हे पद प्रतिनियुक्तीचे असल्यानंतरही चार ज्येष्ठ अभियंत्यांना संधी नाकारली गेली. त्यामुळे आता नवे आयुक्त संजय निपाणे यांनी शासनस्तरावरून पाठपुरावा करून शहर अभियंता आणावा, अशी अपेक्षा आहे.
जाधव रूजू झालेच नाहीत
मागील आठ महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संतोष जाधव या कार्यकारी अभियंत्याची महापालिकेत बदली केली. मात्र, सदारांच्या आधीचा त्यांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि गहरवार, सोनवणे आणि पवारांशी महापालिकेने काय केले, हे ज्ञात असल्याने जाधव रुजूच झाले नाही. रुजू झाल्यास आपल्याकडेही शौचालय, घरकुल योजनांचे कार्यान्वयन दिले जाईल, अशी खात्री असल्याने जाधवांनी परस्पर अन्यत्र बदली करून घेतली.