तलाव सौंदर्यीकरणातून रस्ता बांधकामाचा घाट!
By admin | Published: November 4, 2015 12:34 AM2015-11-04T00:34:53+5:302015-11-04T00:34:53+5:30
शहरातील सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भंडारा नगर पालिकेने २.२५ कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता दिली असली तरी ...
प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव : तत्कालीन नगराध्यक्षांनी दिली तांत्रिक मान्यता
भंडारा : शहरातील सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भंडारा नगर पालिकेने २.२५ कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता दिली असली तरी या कामातून त्या परिसरात असलेल्या ले-आऊटमध्ये जाण्यासाठी रस्ता बनविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. सध्या ही फाईल जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी असून स्थानिक आमदाराने या कामाविषयी नगरविकास मंत्रालयात तक्रार केलेली आहे.
शहरातील तलाव सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याच धर्तीवर सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तत्कालीन नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांच्या काळात पालिकेने २.२५ कोटी रुपयांचा निधीला तांत्रिक मान्यता दिली. या निधीतून तलावाचे सौंदर्यीकरण झाले तर शहराच्या सौंदर्यात भर पडू शकते. परंतु सागर तलावाच्या पाळीवरुन रस्ता बनविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली आहे. काजीनगर गेटमधून पूढे जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु त्यापलिकडे चार ते पाच एकर परिसरात ले-आऊट पाडण्यात आलेले आहे. परंतु रस्ता नसल्यामुळे त्या ले-आऊटला मागणी नाही. त्यामुळे सागर तलाव सौंदर्यीकरणाच्या नावावर निधी मिळविण्यात आला आहे. हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी राहणार नसून केवळ ले-आऊट धारकांसाठी करण्याचा मनसुबा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)