डेंग्यू अंगावर काढाल तर जीव गमवाल; २८ जण फणफणले!

By प्रदीप भाकरे | Published: July 18, 2024 06:47 PM2024-07-18T18:47:27+5:302024-07-18T18:49:43+5:30

गृहभेटींवर भर : महापालिका ‘ॲक्शन मोड’वर

Consult a Doctor if you caught dengue; 28 people are infected in Amravati | डेंग्यू अंगावर काढाल तर जीव गमवाल; २८ जण फणफणले!

Consult a Doctor if you caught dengue; 28 people are infected in Amravati

प्रदीप भाकरे 
अमरावती :
अमरावती शहरातील डेंग्यूबाधितांची संख्या यंदाच्या साडेसहा महिन्यांत २८ वर पोहोचली आहे. त्यातील ११ डेंग्यू पॉझिटिव्ह हे गेल्या १७ दिवसांतील असून, जूनमध्येदेखील १० रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यूबाधित निघाले होते. जानेवारी ते १७ जुलै या कालावधीत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एकूण ७२ संशयितांचे नमुने तपासणीस पाठविले होते. प्रभावी उपाययोजना म्हणून एसओपी तयार करण्यात आला असून, अधिकाधिक गृहभेटींवर भर दिला जात आहे. तर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने शहरातील डेंग्यूबाधितांची संख्या ३७ अशी सांगितली आहे.
             

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैच्या पहिल्या १७ दिवसांत अर्जुननगर, साईनगर व अन्य परिसरात ११ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या त्या भागात सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. डेंग्यूसदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत.

"जानेवारी ते १७ जुलेैपर्यंत अमरावती शहरात एकूण २८ डेंग्यूबाधित आढळून आले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासह जलद ताप सर्वेक्षण व गृहभेटींवर जोर देण्यात येत आहे. शहरी आरोग्य केंद्रांकडून ते सर्वेक्षण केले जात आहे."
- डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Consult a Doctor if you caught dengue; 28 people are infected in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.