‘त्या’ कन्सल्टंटचा महापालिकेत स्वैर वावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:41 AM2018-01-06T01:41:18+5:302018-01-06T01:41:34+5:30
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीसाठी राबविलेली निविदाप्रक्रिया संदीप देशमुख या तथाकथित कन्सल्टंटने ‘मॅनेज’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागात त्यांचा स्वैर वावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीसाठी राबविलेली निविदाप्रक्रिया संदीप देशमुख या तथाकथित कन्सल्टंटने ‘मॅनेज’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागात त्यांचा स्वैर वावर आहे.
महापालिकेच्या विविध फायली हाताळत असताना संदीप देशमुख यांना कुणीही अटकाव घालत नाही. यावरून संदीप देशमुखांची अधिकाºयांच्या लेखी असलेली ‘अर्थपूर्ण’ उपयोगिता लक्षात घेण्याजोगी आहे. देशमुख हे महापालिकेत निविदाप्रक्रिया करण्याचे काम उत्कृष्टरीत्या बजावतात, हे वास्तव जगजाहीर आहे. मात्र त्यांना तसा अधिकार आहे का, हे मात्र अनुत्तरित आहे. महापालिकेत ‘प्रोजेक्ट को-आॅर्डिनेटर’ वजा प्रकल्प सल्लागार म्हणून आयुक्तांनी आपली आॅर्डर काढली आहे, असे ते सांगतात. हे एकवेळ सत्य मानल्यास ते महापालिकेच्या प्रत्येक विभागात जाऊन तेथील फाइल, संगणक हाताळू शकतात काय, सिंगल कॉन्ट्रक्टच्या निविदा प्रपत्रातील अटी-शर्तींमध्ये बदल करू शकतात काय, याचे उत्तर देशमुख यांच्यासह महापालिका प्रशासनाला द्यावे लागणार आहे.
आयुक्त हेमंत पवार यांच्यासह उपायुक्तद्वय नरेंद्र वानखडे व महेश देशमुख, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्यासह अनेक विभागांत संदीप देशमुख फाइल घेऊन फिरत असतात. ते कुठल्या पदावर आहेत, हे कुणीही अधिकृत सांगायला तयार नाही. मात्र, निविदाप्रक्रिया असल्यास प्रत्येकाला त्यांची गरज भासते. या अनधिकृत व्यक्तीवर प्रशासनाचाही अंकुश नाही. खासगी व्यक्तीची महापालिकेतील घुसखोरी आयुक्तांनी थांबवावी, अशी अपेक्षा आहे.
कार्यकारी अभियंत्याच्या दालनात बस्तान
संदीप देशमुख हे कार्यकारी अभियंता अनंत पोतदार यांच्या दालनात नेहमीच असतात. अगदी बिनधास्तपणे ते पोतदार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून त्यांचे संगणक हाताळतात. पोतदार यांच्या कार्यालयातील कंत्राटी कर्मचारीही त्यांचे संगणक देशमुख यांना विनासायास उपलब्ध करून देतात.