कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी हॅक करून अश्लिल‘मार्फिंग’;तरूणाला ७.६६ लाखांचा गंडा
By प्रदीप भाकरे | Published: July 27, 2023 12:58 PM2023-07-27T12:58:01+5:302023-07-27T12:58:06+5:30
गुगलवरून त्याने संबंधित वेबसाईट व लोन ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्याची संपुर्ण माहिती, बॅक डिटेल्स, बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर देखील घेतला.
अमरावती - इझी लोन देण्याची बतावणी करून एका तरूणाची तब्बल ७ लाख ६६ हजार ९० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली. आरोपी मोबाईल युजर्स तेवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी त्या तरूणाच्या मोबाईलमधील गॅलरी हॅक करून त्याच्या छायाचित्रांचे मार्फिंग केले, ते माॅर्फिंग केलेले फोटो आक्षेपार्ह व अश्लिल मजकूर टाकून त्याच्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठविण्यात आले. १५ एप्रिलपासून तो प्रकार सुरू झाला. अखेर २६ जुलै रोजी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बुधवारी दुपारी अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल केला.
यातील गौरव (३२) नामक तक्रारकर्ता हा जलारामनगर येथील रहिवासी असून त्याला पैशाची आवश्यकता असल्याने त्याने गुगलवर इझी लोन देणाऱ्या वेबसाईट सर्च केल्या. गुगलवरून त्याने संबंधित वेबसाईट व लोन ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्याची संपुर्ण माहिती, बॅक डिटेल्स, बॅंक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर देखील घेतला. त्या ॲपवरून गौरवने काही रक्कम कर्जाऊ घेतली. मात्र, संबंधिताने अवास्तव व्याज आकारले. त्यामुळे त्याने व्हॉट्सॲपवर त्या व्याजआकारणीबाबत आवाज उठविला. मात्र तोपर्यंत अज्ञात आरोपींनी त्याच्या खात्यातून तब्बल ७.६६ लाख रुपये परस्पर उकळले होते.