धारणीत कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:21+5:302021-04-05T04:11:21+5:30
(फोटो पी ०३ धारणी) धारणी : नगरपंचायतीत पाण्याचे भरपूर स्त्रोत उपलब्ध असून, जवळपास सर्व प्रभागांत एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा ...
(फोटो पी ०३ धारणी)
धारणी : नगरपंचायतीत पाण्याचे भरपूर स्त्रोत उपलब्ध असून, जवळपास सर्व प्रभागांत एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता त्याला फाटा देण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरातील अनेक प्रभागांमध्ये जाणूनबुजून तीन ते चार दिवसपर्यंत पाणीपुरवठा केला जात नाही. जनतेला होणारा त्रास दूर करण्यासाठी आम्ही किती प्रयत्नशील आहोत, हे भासविण्यासाठी इच्छुक व माजी नगरसेवकांकडून टँकरद्वारे पाणी वितरित होत असल्याचा भास निर्माण केला जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून, विनाकारण नागरिकांना टँकरमधून पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.
वास्तविक पाहता शहरातील पाणीपुरवठा योजना व्यवस्थित असून, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. मात्र, नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे पाण्यालासुद्धा आता मुद्दा बनविण्यात येत असून, त्यामागे कटकारस्थान सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरपंचायतीचे प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी लक्ष द्यावे, अशी धारणीकरांची अपेक्षा आहे.