संपत्तीच्या वादातून घरातील साहित्य फेकले
By admin | Published: March 1, 2017 12:08 AM2017-03-01T00:08:35+5:302017-03-01T00:08:35+5:30
संपत्तीच्या वादातून जाफरजीन प्लॉट येथील रहिवासी दीपक मोतीलाल कौसकिया यांच्या घरातील साहित्यांची फेकफाक करण्यात आली.
जाफरजीन प्लॉटमधील घटना : राजकीय वर्तुळात खळबळ
अमरावती : संपत्तीच्या वादातून जाफरजीन प्लॉट येथील रहिवासी दीपक मोतीलाल कौसकिया यांच्या घरातील साहित्यांची फेकफाक करण्यात आली. मंगळवारी रात्री हा वाद उफाळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोन कुटुबांतील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर या भागात तणावसदृश परिस्थिती होती.
जाफरजीन प्लॉट येथे गोपीचंद जीवनदास बगई यांच्या मालकीची एक इमारती होती. सद्यस्थितीत त्यांच्या इमारतीचा अर्धा भाग दीपक कौसकीया व अर्धा भाग गंगाराम रामअहेर निशाद यांचे नावे आहे. या एकाच इमारतीत ही दोन्ही कुटुंबीय राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये संपत्तीचा वाद निर्माण झाला. हे प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे. मात्र, मंगळवारी सकाळी निशाद यांच्या कुटुंबियांनी दीपक कौसकिया यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणात दीपक कौसकीयाविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ४४८, २९४, ५०४, ५०६, ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाच्या संबधाने मंगळवारी दिपक कौसकीया यांच्या कुटुंबीयांना चौकशीकरिता ठाण्यात बोलाविले होते. कौसकीया कुटुंब ठाण्यात गेले असता निशाद यांच्या कुटुबियांनी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी कौसकीया यांच्या घरातील साहित्यांची फेकफाक सुरू केल्याचा आरोप कौसकीया कुटुंबियांनी केला आहे. सायंकाळी ४ वाजतापासून कौसकीया कुटुंबीयांच्या घरातील साहित्यांची फेकफाक सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हा वाद सुरुच होता. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. घटनेच्या माहितीवरून एसीपी नरेशकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी दोन्ही कुटुबातील वाद शांत करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, दोन्ही कुटुबीयांतील सदस्यांमध्ये शाब्दीक वाद सुरुच होता. याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. (प्रतिनिधी)