संपूर्ण लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:00 AM2021-12-08T05:00:00+5:302021-12-08T05:01:03+5:30
कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, या संसर्गामुळे निर्माण झालेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांना गाफील राहून चालणार नाही. गतवेळच्या साथीने दिलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. भीती नको; पण दक्षता बाळगावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे आढळलेले रुग्ण, मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले नवे नऊ कोरोनाबाधित लक्षात घेता सर्वत्र सतर्कता बाळगण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केले. प्रशासनाने मोहिमेद्वारे लसीकरणाला वेग दिला. तथापि, प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
भीती नको; पण दक्षता बाळगा
कोविड साथीचे प्रमाण घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत विविध बाजारपेठा, व्यवहार यांना परवानगी देण्यात आली. तथापि, या संसर्गामुळे निर्माण झालेला धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांना गाफील राहून चालणार नाही. गतवेळच्या साथीने दिलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. भीती नको; पण दक्षता बाळगावी. प्रत्येकाने मास्क, शारीरिक डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन करावे. असे आवाहन पालकमंत्री ठाकूर यांनी केले.
लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये
- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. मोहिमेत लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी लसीकरणाची दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्याप ३५ टक्के एवढे आहे. हे कमी प्रमाण पाहता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण व्हावे. ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नाही किंवा दुसरी मात्रा घेतलेली नाही, त्यांनी तात्काळ आपले लसीकरण करून घ्यावे व स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
- कोरोनाकाळात विविध क्षेत्रांना अडचणींना सामोरे जावे लागले. शासन व प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साथ नियंत्रणात आली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. आता पुन्हा साथ वाढता कामा नये. कोविड अनुरूप जीवनशैलीचा अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.