अन्यायकारक धोरणाविरोधात एकवटलेत कंत्राटी कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:59 PM2018-02-21T22:59:34+5:302018-02-21T22:59:51+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात कंत्राटी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे नियमित आदेशात अडचणी निर्माण होणार, असे परिपत्रक शासनाने न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेऊन काढले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्व कंत्राटी कर्मचारी कृती समिती इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाचे याकडे लक्ष वेधले.
कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तींबाबत व सेवा अनियमिततेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील तीन लाखांवर कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने हा अन्यायकारक निर्णय रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना केली. यावेळी प्रशांत जोशी, अजिक्य काळे, प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे, प्रफुल्ल रिधोरे, प्रकाश आंबेकर, विवेक राऊत, शंशाक पैठणकर, प्रमोद मिसाळ, श्याम देशमुख विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्या आदेशाची होळी
मी कंत्राटी, मी लाभार्थी होय हे माझे सरकार असे बिल्ले लावून त्यांनी शासनाच्या जाहिरातीचाही निषेध केला. शासनाने काढलेल्या त्या आदेशाची आंदोलकांनी होळी करून रोष व्यक्त केला आहे.