तर कंत्राटदारास दरदिवशी दोन हजार रूपये दंड
By admin | Published: August 30, 2015 12:11 AM2015-08-30T00:11:26+5:302015-08-30T00:11:26+5:30
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे सुरू असलेली विकासकामे विहित मुदतीत आणि मुदतवाढ दिल्यानंतरही पूर्ण झाली नसल्याने ...
जिल्हा परिषद : बांधकाम समितीचा निर्णय
अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे सुरू असलेली विकासकामे विहित मुदतीत आणि मुदतवाढ दिल्यानंतरही पूर्ण झाली नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम समितीने संबंधित कंत्राटदाराला दरदिवशी दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी वित्त विभागाला प्रस्ताव दिल्यानंतरही यावर कुठलीही अंमलबजावणी केली नसल्याने आता पुन्हा बांधकाम समितीने दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
तीर्थक्षेत्र विकास आराखडयामार्फत सुमारे ३ कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी ‘ग्रीनअर्थ’ या कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी १८ आॅगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपूनही रस्त्याचे अर्र्धेच काम झाले आहे. उर्वरित काम सुरू असले तरी कामाची गती मंद असल्याने कंत्राटदाराला कळविण्यात आले. त्यानंतरही यात सुधारणा झाली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीने शुक्रवारी पार पडलेल्या सभेत या कंत्राटदाराला १८ आॅगस्टपासून दर दिवशी दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील कारवाई करण्याचे निर्देश बांधकाम सभापती गिरीश कराळे यांनी मुख्यलेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांना दिले आहेत. या बैठकीला सभापती गिरीश कराळ, विक्रम ठाकरे, विनोद डांगे, प्रवीण घुईखेडकर, निशांत जाधव, मोहन सिंगवी, ममता भांबुरकर, प्रेमा खलोकार, पी.जी.भागवत, उपअभियंता गावंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)