परस्परविरोधी तक्रारींचा फंडा

By admin | Published: August 18, 2015 12:24 AM2015-08-18T00:24:19+5:302015-08-18T00:24:19+5:30

आता याप्रकरणातील आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस चौकशी निष्पक्षपणे आणि मूळ मुद्यांच्या आधारे झाल्यास खरे काय...

Contradictory Complaints Fund | परस्परविरोधी तक्रारींचा फंडा

परस्परविरोधी तक्रारींचा फंडा

Next

अमरावती /अचलपूर : आता याप्रकरणातील आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस चौकशी निष्पक्षपणे आणि मूळ मुद्यांच्या आधारे झाल्यास खरे काय ते बाहेर येईलच. अवैध व्यवसाय आणि गुंडगिरीसाठी बारूद गँगच्या सदस्यांना नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांची मदत मिळाली? या प्रकरणाचा तपास व्हायला हवा.
‘बारूद गँग’ला विरोध करणाऱ्या एखाद्या व्यक्तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याला बेदम मारहाण करायची. ती व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेली की लगेच या गँगच्या एखाद्या सदस्याने स्वत:लाच जखमी करून घ्यायचे आणि त्या व्यक्तिविरूध्द पोलिसांत तक्रार नोंदवायची, असा यांचा फंडा होता. पोलिसही डोळे झाकून परस्पर विरोधी तक्रारी नोंदवून घ्यायचे. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करायचे. पण, प्रकरणाची शहानिशा करण्याची तसदी कधीही पोलिसांनी घेतली नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळेच की काय मारहाण झाल्यानंतरही बरेचदा अन्यायग्रस्त व्यक्ती पोलिसांत तक्रार नोंदविण्यास धजावत नसत.
असाच प्रकार अमित बटाऊवाले हत्याकांडानंतरही घडल्याची चर्चा आहे. अमितचा खून झाल्यानंतर बारूद गँगचे शाहबाद आणि बादशाह हे दोन सदस्य पोलीस ठाण्यात गेले. त्यातील शाहबाद हा जखमी होता. बारूद गँगवर पोलिसांचाच वरदहस्त असल्याने त्यांच्या कूकृत्यामध्ये पोलीस मुकाटपणे परस्परविरोधी गुन्हे दाखल करीत असत. असाच प्रकार सात ते आठ महिन्यांपूर्वी मुंदे हल्ला प्रकरणातही घडला होता.
बारूद गँगचा एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष तर मुख्य आरोपी नगरसेवक असल्याने त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे जनता आता बोलून दाखवीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह वरिष्ठांनी अद्यापही या गुन्हेगार असलेल्या शहराध्यक्षावर पक्षांतर्गत कारवाई केली नाही, ही बाब या जनचर्चेला दुजोरा देणारी आहे.

रेतीचे ट्रक पकडल्यास मुंबईतून यायचे फोन
जुळ्या नगरीत सुरू असलेल्या वाळू माफियांच्या उच्छादाला आणि त्यानंतर घडलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडाला अनेक पैलू आहेत. याप्रकरणी असलेली पोलिसांची संशयास्पद भूमिका उघड झाल्यानंतर आणि त्यानंतर नाईलाजास्तव पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्याने आतापर्यंत ‘बारूद गँग’च्या दहशतीखाली असलेल्या जनतेचा धीर चेपला आहे. रेती तस्करीत एका मोठ्या पक्षवजा संघटनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून रेती तस्करीचे ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते सोडण्यासाठी थेट मुंबईहून फोन येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अचलपूर : येथील अमित बटाऊवाले व मोहन बटाऊवाले यांच्यावर वाळूमाफियांनी केलेल्या हल्ल्यातील आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई व महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अचलपूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राजा पिंजरकर, गोविंद शिरभाते आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली याबाबत कारवाई करण्यासाठी महसूलमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू
याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडूनही केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी एका युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

अमित बटाऊवाले हत्याकांडात नगरसेवक मो. शाकीर हे आरोपी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे. याबाबत पालिकेतही ठराव घेतला जावा. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत.
- नरेंद्र फिसके, माजी उपनगराध्यक्ष,
माजी शिवसेना तालुका प्रमुख.

Web Title: Contradictory Complaints Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.