नगरसेवकाशी वाद, हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:01 AM2019-09-10T01:01:29+5:302019-09-10T01:01:52+5:30
पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले. राजापेठ हद्दीतील चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाळ्यात अंबा नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची समस्या दूर न झाल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी एका कुटुंबाचा अंबापेठ प्रभागाचे नगरसेवक प्रणित सोनी यांच्याशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याने नगरसेवक प्रणित सोनीसह सहा जण जखमी झाले. राजापेठ हद्दीतील चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली. यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलीस सूत्रानुसार, प्रणित सोनी, त्यांचे भाऊ दर्शन सोनी, शशांक जोशी, कुणाल सोनी (सर्व रा. बालाजी प्लॉट) आणि बुंदेले कुटुंबातील अक्षय (२५), त्याचे वडील गोपीचंद (५५) व आई रेखा (५० तीन्ही रा. चुनाभट्टी) अशी जखमींची नावे आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात अंबा नाला ओव्हरफ्लो होऊन नाल्याकाठी राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत नागरिक नगरसेवकांची दारे ठोठावतात. चुनाभट्टी परिसरालगत अंबा नाला असून, तेथील बुंदेले कुटुंबीयांनी नाल्यातील पाणी घरात शिरत असल्याबद्दल नगरसेवक प्रणित सोनींकडे समस्या मांडली होती. सोमवारी दुपारी प्रणित सोनी, त्यांचे भाऊ दर्शन, शशांक व कुणाल असे चौघे चुनाभट्टी परिसरात उपस्थित असताना, अक्षय बुंदेलेने घरात पाणी शिरत असल्याबाबत सांगितले आणि उपाययोजना केव्हा कराल, याबाबत विचारणा केली. शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच बुंदेले कुटुंबीय व प्रणित सोनी यांच्या हाणामारी सुरू झाली. लाथाबुक्क्या, लाठी व दगडांनी एकमेकांवर हल्ला केला. प्रणित सोनीसह दर्शन, शशांक, कुणाल तसेच अक्षय बुंदेले, गोपीचंद बुंदेले व रेखा बुंदेले जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांतील जखमींना तात्काळ पोलीस ठाण्यात नेले तसेच इर्विन रुग्णालयात उपचारासाठी आणले. सायंकाळनंतर राजापेठ पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या.
अक्षय बुंदेले याच्या तक्रारीवरून नगरसेवकासह चार जणांविरुद्ध भादंविचे कलम ३२६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक प्रणित सोनीेच्या तक्रारीवरून बुंदेले कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दर्शन सोनी, शशांक जोशी, अक्षय बुंदेले व कुणाल सोनी यांना अटक केली.