महापालिका आयुक्तांच्या वक्तव्यावर वादंग

By admin | Published: September 5, 2015 12:13 AM2015-09-05T00:13:29+5:302015-09-05T00:13:29+5:30

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी येथील एकवीरा व अंबादेवीबाबत गुरुवारी केलेल्या असंवैधानिक वक्तव्याने वादंग उठले आहे.

The controversy over the statement of Municipal Commissioner | महापालिका आयुक्तांच्या वक्तव्यावर वादंग

महापालिका आयुक्तांच्या वक्तव्यावर वादंग

Next

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संताप : अंबा, एकवीरा देवीबाबत अपमानजनक वक्तव्य
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी येथील एकवीरा व अंबादेवीबाबत गुरुवारी केलेल्या असंवैधानिक वक्तव्याने वादंग उठले आहे. हिंदू धर्मियांच्या देवी, देवतांना एकेरी भाषेचा उल्लेख करुन काय साध्य करायचे आहे, असा सवाल विश्व हिंदू परिषदेने शुक्रवारी आयुक्तांना जाब विचारताना केला.
आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी महापालिकेत ‘भारत स्वच्छ अभियान’ या योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय देण्याच्या अनुषंगाने आरोग्य निरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अधिकारी वर्गदेखील उपस्थित होता. यावेळी आयुक्तांनीे आरोग्य निरीक्षकांना मार्गदर्शन करताना कर्तव्याविषयीचा मुद्दा बाजुला ठेवून ते थेट येथील अंबादेवी, एकवीरा देवी मंदिर मोजणीच्या विषयाला त्यांनी हात घातला. ‘मी यापूर्वी अंबादेवी, एकवीरा देवी मंदिराची मोजणी केली. एवढेच नव्हे, तर मंदिराच्या विश्वस्तांची घरेदेखील मोजली. परंतु माझे काहीही झाले नाही', असे ते बोलले. आयुक्तांनी केलेले हे वक्तव्य रेकॉर्डिंग केले आहे. त्यांनी शहरातील प्राचीन अंबादेवी, एकवीरा देवी मंदिराविषयी केलेल्या वाचाळ वक्तव्याचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने तीव्र शब्दांत शुक्रवारी निषेध नोंदविला. विश्व हिंदू परिषदेचे विजय शर्मा यांच्या नेतृत्वात हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला. यावेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचे आयुक्तांनी ऐकून घेतले. मात्र आयुक्तांनी उद्भवलेला प्रसंग साधून देवीबाबतचे वक्तव्य चूक झाल्याचे मान्य केले. परंतु विहिंपच्या कार्यकर्त्यांनी माफी मागून चालणार नाही, जाहीर खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर हा वाद निवळला. देवी, देवतांबद्दल चुकीचे विधान केले तर याचे गंभीर परिणाम होतील, असा निर्वाणीचा इशारा विहिंपचे विजय शर्मा, युवा सेनेचे राहुल माटोडे, अनिल साहू, शरद अग्रवाल, संदीप बेहरे, विपीन गुप्ता आदी हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही धर्माबद्दल उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी असंवैधानिक व्यक्तव्य करणे बरोबर नाही. अंबा, एकवीरा देवी यांच्याबद्दल काही बोलले असेल तर विषय गंभीर आहे. जनतेच्या आस्थेचा विषय असून आयुक्तांच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल.
- प्रवीण पोटे,
पालकमंत्री, अमरावती.
देवींबद्दल केलेल्या वक्तव्याची आयुक्तांनी जाहीर माफी मागावी. स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी देवी, देवतांचे अपमान सहन केले जाणार नाही. यापुढे वाचाळासारखे आयुक्त बोलले तर ते शब्द त्यांच्यात घशात उतरविले जातील.
- तुषार भारतीय,
शहराध्यक्ष, भाजप.
हिंदूंच्या देवी, देवतांबद्दल अपमानजक वक्तव्य करणे योग्य नाही. आयुक्त पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे म्हणजे, त्यांचे ब्रेन मॅपिंग करण्याचा प्रसंग आला आहे. यापुढे आयुक्तांनी असे विधान केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.
- प्रवीण हरमकर,
विरोधी पक्षनेता.
ंकर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, यासाठी मी यापूर्वी अंबादेवी, एकवीरा देवी मंदिराची मोजणी केली, या कर्तव्य भावनेचा उल्लेख केला होता. मात्र कुणाच्या भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त करतो.
-चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.
सलग तीन वेळा एकवीरा व अंबादेवीबाबत अपमानास्पद वक्तव्य केले आहे. जनतेच्या आस्थेला हात घालण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. धार्मिक भावना दुखावू नये, अन्यथा गंभीर परिणाम होतील.
-दिगंबर डहाके, माजी शहराध्यक्ष, शिवसेना

Web Title: The controversy over the statement of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.