रयतेचीही व्हावी सोय!

By admin | Published: November 27, 2014 11:26 PM2014-11-27T23:26:23+5:302014-11-27T23:26:23+5:30

केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर

The convenience of the raiti too! | रयतेचीही व्हावी सोय!

रयतेचीही व्हावी सोय!

Next

अमरावती : केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले गेले. आकर्षक फुटपाथ निर्माण केले गेलेत. तुंबून वाहणारे, दुर्गंधी अन् आजारांचा फैलाव करणारे कचऱ्याचे मोठ्ठे कंटेनर मार्गातून अचानक गायब झाले. निधीचा सुकाळ असावा अशा मानसिकतेने त्या परिसरात कामे करण्यात आलीत. साफसफाईसाठीही तरसणाऱ्या नागरिकांना ते सर्व स्वप्नवतच वाटत होते. मुख्यमंत्री आगमनाच्या वर्दीने हे सर्व घडत होते.
हे अवघे राज्य चालविणारे मुख्यमंत्री याच राज्यातील आहेत. ते याच व्यवस्थेत वाढले आहेत. सामान्य नागरिक ज्या व्यवस्थेत राहतात त्या व्यवस्थेत मुख्यमंत्रीदेखील राहूच शकतात, इतके ते जमिनीशी जुळलेले आहेत! केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून सामान्य नागरिकांनी पदरमोड करून भरलेल्या करापोटीचा निधी असा वारेमाप उधळण्याची खरच गरज होती काय? नम्र अन् शालिन स्वभावाचे, सामान्यांचे प्रतिनिधीत्त्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तरी तशी अपेक्षा असेल काय? कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन देण्याची सोय नसलेल्या महापालिकेला केवळ एका व्यक्तीच्या सोयीसाठी सामान्यांचा पैसा उधळताना एकदातरी विचार करायला नको होता काय? हा बडेजाव बघून 'लोकांच्या मुख्यमंत्र्यां'ची शाबासकी मिळविण्यात महापालिका यशस्वी होणार आहे काय? बालाजी प्लॉट परिसरात रस्ते झाले ती आनंदाचीच बाब झाली. त्यानिमित्ताने त्या परिसरातील लोकांची समस्या सुटली; तथापि त्या कार्यामागे लोकांची सुविधा करण्याचा जराही हेतू महापालिकेचा नव्हता. मानस होता तो मुख्यमंत्र्यांना खूश करण्याचा. आमचा सवाल महापालिकेच्या त्या मानसिकतेवर आहे. सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आद्य कर्तव्य करदात्या सामान्यजनांची सोय करणे हे आहे. महापालिकेला हा विसर का पडावा?
मुख्यमंत्री महोदय, अमरावतीकरांना जशी व्हीव्हीआयपी बघण्याची सवय झाली आहे ना, तशीच त्या व्हिव्हिआयपींसाठी सामान्यांचा पैसा खर्ची घालताना बघणेही अंगवळणी पडले आहे.
माजी राष्ट्रपती आणि माजी राज्यपाल यांच्या काँग्रेसनगरातील निवासस्थानांसमोरील रस्ते असेच अचानक भलेमोठे, काळेशार अन् चकचकित झाल्याचे अमरावतकरांनी बघितले आहे. बगिच्यात झाडे नसतील परंतु या रस्त्यांवरची हिरवळ तळहातावरील फोडांप्रमाणे जपल्याचे अमरावतीकरांनी अनुभवले आहे. आमदारांच्या घरांसमोरील स्वच्छता अन् टापटीप नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सामान्यजन भरत असलेल्या करांचा उपयोग व्हिव्हिआयपींच्या सोईसाठी करायचाच असतो हे नेहमीचे समिकरण आपल्याबाबत मात्र अपेक्षित नव्हते. आपण 'जरा हटके' आहात. आपल्या रूपाने सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्याचा भास नागरिकांना होतो. आपल्यासाठी सर्वसामान्यांच्या पैशांची उधळण झाली नि आपल्या आगमनाइतकीच त्या मुद्याचीही शहरात चर्चा झडली. आपल्यासाठी जी सोय झाली ती अमरावतीतील आपल्या रयतेसाठीही व्हावी, इतकेच!

Web Title: The convenience of the raiti too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.