विद्यार्थ्यांना चालान भरण्यासाठी एकाच बँकेत सुविधा
By admin | Published: July 1, 2014 11:12 PM2014-07-01T23:12:24+5:302014-07-01T23:12:24+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध परीक्षेसंदर्भात आवेदनपत्र शुल्क भरण्याची सुविधा भारतीय स्टेट बँक या एकमेव बँकेत केली आहे. यामुळे एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होऊन तारांबळ उडत आहे.
विद्यापीठाविरुध्द संताप : परीक्षा आवेदनपत्र शुल्क भरण्यासाठी रांगा
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध परीक्षेसंदर्भात आवेदनपत्र शुल्क भरण्याची सुविधा भारतीय स्टेट बँक या एकमेव बँकेत केली आहे. यामुळे एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी होऊन तारांबळ उडत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून विद्यापीठ प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे सादर करण्याकरिता सुलभ व्हावे म्हणू महाविद्यालयामार्फत परीक्षा आवेदनपत्र भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यापीठात येणारा विद्यार्थी अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशीम या जिल्हातील असून बहुतांश अनुतीर्ण (माजी) विद्यार्थी परीक्षा आवेदनपत्रे महाविद्यालयात न पाठविता ते थेट विद्यापीठात येऊन शुल्क भरतात. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या रागां लागतात. या विद्यार्थ्यांच्या सोईकरिता स्टेट बॅकेत चालान भरण्याची सुविधा विद्यापीठाने केली आहे. याकरिता बँक विद्यार्थ्यांकडून ३० रुपये सेवा शुल्क आकारते. शुल्काची चालान आवेदनपत्रासह पोस्टाद्वारे व थेट विद्यापीठात दाखल करु शकतात. मात्र जिल्हात स्टेट बँकेच्या शाखा मोजक्याच तर विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बँकेच्या विविध शाखांमध्ये चालान काढण्याकरिता विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास बँकेत रांगा लावून उभे राहावे लागत आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाने आणखी काही बँकांमध्ये चालानची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.