आता महाविद्यालय स्तरावर होणार दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:40 PM2018-01-16T22:40:25+5:302018-01-16T22:41:08+5:30
विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे.
विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात आचार्य पदवी, गुणवत्ता यादीत स्थान पटकवणारे तसेच पारितोषिक विजेते अशा मोजक्याच विद्यार्थ्यांचा गौरव होतो. उर्वरित पदवीधरांना जागेवर उभे राहून पदवी मिळाल्याची घोषणा केली जाते. त्यानंतर एका रांगेत लिपिक दर्जाच्या कर्मचाºयांकडून पदवी दिली जाते. यामुळे प्रत्येक पदवीधराचा सन्मान व्हावा, यासाठी महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभाचे आयोजन करण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे समारंभात येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा प्रवास खर्च, गैरसोय तसेच पदवीसाठी लागणारा खर्च थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयास २१ आॅगस्ट २०१५ रोजी तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
दरम्यान, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदवी समारंभ यंदा २३ फेब्रुवारी रोजी होत आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ स्तरावर दरवर्षी होणाºया दीक्षांत समारंभात २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. दीक्षांत समारंभासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते आदी चमू जोमाने कार्यरत आहे.
समारंभाचा खर्च विद्यापीठ देणार
येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयस्तरावर होणाºया पदविदान समारंभाचा खर्च विद्यापीठाकडून विद्यार्थीनिहाय मिळेल. समारंभाचे स्वरूप, आयोजन, पाहुणे आदी बाबी प्राचार्यांना ठरवाव्या लागतील.
लीड कॉलेजवर जबाबदारीची शक्यता
महाविद्यालय स्तरावर दीक्षांत समारंभ घेण्याबाबत एकमत झाले आहे. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी लीड कॉलेजमध्ये समारंभाच्या आयोजनबाबतही मंथन सुरू आहे.
महाविद्यालय स्तरावर पदविदान समारंभ आयोजनाबाबत नियमावली तयार करण्याची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. ८ ते १० दिवसांत नियमावली तयार होताच, त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. विद्यार्थ्यांचा अभिमान जोपासण्यासाठी हे पाऊल उचलले.
- राजेश जयपूरकर,
प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा विद्यापीठ