महापालिका आयुक्तांचा मौलवी यांच्याशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:22+5:302021-05-05T04:22:22+5:30
अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी शहरातील मुस्लिमबहुल भागातील ...
अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी शहरातील मुस्लिमबहुल भागातील मौलवी यांची बैठक घेतली.
यामध्ये कोरोना संसर्ग खंडित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या व्यवस्थेबाबत काही सूचना देण्यात आल्या. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स, तपासणी, हात वारंवार धुणे, गरम पाणी पिणे, प्रशासन आणि आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीचे अनुसरण, आदींविषयी चर्चा करण्यात आली. कोणतेही सहकार्य लागल्यास प्रशासन व या बैठकीतील प्रतिनिधींनी सयुक्तिक सेवा देण्याचे ठरविण्यात आले. लसीकरण करण्याबाबत जनजागृती करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
कुटुंबातील व्यक्तींना ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास झालेला आहे का, वृद्ध व्यक्तींना काही त्रास होत आहे का, दिव्यांग व्यक्तींना काही त्रास होत आहे का, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोविड १९ या रुग्णांच्या संपर्कात आलेली आहे का, आदी माहिती आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी उपायुक्त रवी पवार, साहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे, तौसिफ काझी, डॉ. फिरोज खान व मौलवी उपस्थित होते.