विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:35 AM2021-02-20T04:35:41+5:302021-02-20T04:35:41+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित ३७ वा ऑनलाईन दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित ३७ वा ऑनलाईन दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना संसर्गाची स्थिती सुधारल्यानंतर हा समारंभ घेण्यात येईल, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पदवी, पदकप्राप्त तसेच गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दीक्षांत समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. विद्यापीठाच्या के.व्ही. देशमुख सभागृहात दीक्षांत समारंभाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. गडकरी हे विद्यापीठात ऑफलाइन उपस्थित राहतील, असे त्यांनी कळविले होते. राज्यपाल कोश्यारी हे दीक्षांत समारंभाला ऑनलाईन उपस्थित राहून संबोधित करतील, असे राज्यपाल कार्यालयाने स्पष्ट केले होते. मात्र, कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विद्यापीठ दीक्षांत समारंभाला परवानगी नाकारली. परिणामी विद्यापीठाने १७ फेब्रुवारी रोजी व्यवस्थापन परिषदेची ऑनलाईन बैठक घेऊन कोरोनाच्या उद्रेकाबाबत चर्चा केली. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेने २१ फेब्रुवारी रोजीचा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
अगोदर दीक्षांत समारंभात २७१ आचार्य पदवीधारकांना पदवी वितरण केली जाणार होती. मात्र, आता कोरोना संसर्गाची स्थिती सुधारल्यानंतर नव्याने दीक्षांत समारंभाची तारीख आणि पाहुणे निश्चित केले जाणार आहेत.
-----------
कोट
व्यवस्थापन परिषदेत झालेल्या निर्णयानुसार दीक्षांत समारंभाचे पुढे आयोजन करण्यात येणार आहे. पाहुण्यांची तारीख, वेळ निश्चित केली जाईल. दीक्षांत समारंभाच्या आयोजनासाठी पुन्हा व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, विद्यापीठ