१० अवैध सावकारांवर सहकार विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:49+5:30
सहकार विभागानुसार, एआर स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझादनगर येथील डॉ. फाजल अली अब्दुल समद अन्सारी यांच्या घरी धाड मारून १६ लाख ९० हजार २०० रुपये, कोरे स्टँप, इसारचिठ्ठी, बक्षीसपत्र, करारनामा, हक्क सोडल्याच्या पावत्या जप्त केल्या. अचलपूरचे एआर अच्युत उल्हे यांच्या पथकाने राजू अवधूतराव काळे (रा. वल्लभनगर) यांच्या घरून १,९५,९०० रुपये रोख, खरेदीखत, करारनामे, कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश आदी जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सहकार विभागाच्या ११ पथकांनी शहरातील १० अवैध सावकारांच्या घरी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत धाडसत्र राबविले. १८ लाख ८८ हजार १०० रुपयांची रोख, कोरे धनादेश, खरेदीखत आदी कागदपत्रे जप्त करण्यात आली.
तालुका उपनिबंधक कार्यालयात शहरातील अवैध सावकारांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात सहकार अधिकारी सुधीर मानकर व एआर राजेंद्र पाळेकर यांनी १३ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ११ सहायक निबंधकांचे स्वतंत्र पथक गठित करून एकाचवेळी धाडसत्र राबविले.
सहकार विभागानुसार, एआर स्वाती गुडधे यांच्या पथकाने आझादनगर येथील डॉ. फाजल अली अब्दुल समद अन्सारी यांच्या घरी धाड मारून १६ लाख ९० हजार २०० रुपये, कोरे स्टँप, इसारचिठ्ठी, बक्षीसपत्र, करारनामा, हक्क सोडल्याच्या पावत्या जप्त केल्या. अचलपूरचे एआर अच्युत उल्हे यांच्या पथकाने राजू अवधूतराव काळे (रा. वल्लभनगर) यांच्या घरून १,९५,९०० रुपये रोख, खरेदीखत, करारनामे, कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश आदी जप्त केले. चांदूरबाजारचे एआर राजेंद्र भुयार यांच्या पथकाने राजेश्वर संतोष सरदार (वनश्री कॉलनी) यांच्या घरी टाकलेल्या धाडीत डायरी, खरेदीखत, इसार पावत्या, हक्क सोडण्याचे लेखे आढळले. वरूड एआर कल्पना धोपे यांना श्रीकांत दातीर (विकास कॉलनी) यांच्या घरी ११ कोेरे धनादेश सापडले. चांदूर रेल्वेचे एआर राजेंद्र मदारे यांनी शेखर ऊर्फ शशीकांत ठाकरे (अर्जुन एम्पायर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत कोरे धनादेश मिळाले. तिवसा एआर सचिन पतंगे यांनी निखिल विलास शेळके (राजहिलनगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत खरेदीखत, ६-२, फेरफार नकला, बक्षीसपत्र, इसारचिठ्ठ्या आढळून आल्या. अमरावतीचे एआर राजेंद्र पाळेकर यांनी अतुल नानाजी ठाकरे (सामरानगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत इसारचिठ्ठी, खरेदीखत, प्रतीज्ञापत्र, वाटणीपत्र सापडले. अमरावतीचेच एआर बी.एस. पाटील यांनी संतोष बाबूलाल साहू (छाया कॉलनी) यांच्या घरी मारलेल्या धाडीत खरेदीखत, डायरी, कच्च्या चिठ्या, चेक, विक्री पावती मिळाली तसेच नांदगाव खंडेश्वरच्या एआर प्रीती धामणे यांनी नारायण अजाबराव मोहोड (किरणनगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत डायरी, हिशेबाच्या चिठ्ठ्या, स्थावर मालमत्ता, खरेदीखत आदी सापडले. मोर्शी एआर सहदेव केदार यांचे पथक अमोल अवधूतराव काळे (न्यू छांगानी नगर) यांच्या घरी मारलेल्या धाडीत हात हलवत परत आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने रोकड ट्रेझरीमध्ये जमा
धाडसत्रात मिळालेली रोडक गुरुवारी रात्री उशिरा येथील टेÑझरीमध्ये जमा करण्यात आली. सायंकाळी ६ नंतर ट्रेझरी बंद होत असल्याने यासाठी जिल्हाधिकाºयांची विशेष परवानगी घ्यावी लागली. कारवाईत जप्त सर्व कागदपत्रे, धनादेश यांची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये अन्य इसमाची कागदपत्रे असल्यास याविषयीची सुनावणी घेतली जाणार आहे. यामध्ये तथ्य आढळल्यास त्या अवैध सावकारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे एआर राजेंद्र पाळेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या आधारे १० अवैध सावकारांविरुद्ध धाडसत्र राबविण्यात आले. नागरिकांनी अवैध सावकारांविरुद्ध न घाबरता सहकार विभागाकडे तक्रारी दाखल कराव्यात.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक