गुणपत्रिकेसोबत कलचाचणी प्रत
By admin | Published: June 24, 2017 12:10 AM2017-06-24T00:10:30+5:302017-06-24T00:10:30+5:30
दहावीचा निकाल लागल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळणार आहेत.
प्रतीक्षा संपुष्टात : दहावीच्या निकालाची गुणपत्रिका आज मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहावीचा निकाल लागल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका मिळणार आहेत. २४ जून रोजी शाळांना आणि त्याच दिवशी विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिका मिळणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांचे तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख देखील शाळांना यावेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. या कलचाचणी अहवालाची विद्यार्थ्यांची मूळ छापील प्रतदेखील आता दिली जाणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल १३ जून रोजी जाहीर करण्यात आला. आॅनलाईन स्वरुपात हा निकाल जाहीर करण्यात आला होता. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी आपले गुण बघितले होते. आॅनलाईन गुणपत्रिकांच्या छायाप्रतिदेखील विद्यार्थ्यांनी घेतल्या होत्या. निकाल लागून दहा दिवस झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून गुणपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
राज्य परीक्षा मंडळाने याबद्दलची सूचना शाळा आणि विद्यार्थ्यांना दिली आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका २४ जून रोजी देण्यात येणार आहेत.
याशिवाय विद्यार्थ्यांचे तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख देखिल शाळांना यावेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि करियर विषय कल जाणून घेण्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचा निकाल आॅनलाईन स्वरुपात याआधीच जाहीर झाला आहे.
कलचाचणी अहवालाची विद्यार्थ्यांची मुळ छापील प्रत देखिल विद्यार्थ्यांना शाळेतून गुणपत्रिकेसोबत मिळणार आहे. या गुणपत्रिकेच्या जोडीने यांचा कलचाचणी अहवालही त्यांना शाळेतून उपलब्ध करून दिली आहे.