कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:26 AM2021-09-02T04:26:17+5:302021-09-02T04:26:17+5:30
अमरावती : कोरोनाकाळापूर्वी लग्न ही बडेजाव मिरवण्याची बाब होती. मात्र, कोरोना आला नि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लग्नसोहळ्यांनाही बंदिस्त करून ...
अमरावती : कोरोनाकाळापूर्वी लग्न ही बडेजाव मिरवण्याची बाब होती. मात्र, कोरोना आला नि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लग्नसोहळ्यांनाही बंदिस्त करून टाकले. काय राजा नि काय रंक, सर्वांना मॅरेज हॉलचे बूकिंग मोडून वधुमंडपी लग्न लावून एकाच वाहनापुरतेच वऱ्हाडी घेऊन परतावे लागले. ना बँड, ना जेवणावळी, ना नाच-गाणे, ना वऱ्हाडींची धूमधाम. अशा स्थितीत वर-वधुमंडपी लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. सुरुवातीच्या काळात जेव्हा कोरोनाबाबत जनजागरण झाले नव्हते, तोपर्यंत लग्नमंडप म्हणून महागड्या मॅरेज हॉलचा विचार केला जायचा. मात्र, जसजसे कोरोनाने विकराल रूप धारण केले, तसतसे वधुमंडपी लग्न व इतर गोष्टींना फाटा या बाबी जनमानसाने स्वीकारल्या. वऱ्हाडींची संख्या बोटावर मोजण्याएवढी, फार तर ५० च्या थोडे पुढे अशी नियंत्रित झाली. या काळात शेतीला फार महत्त्व आले आहे. कारण पुण्या-मुंबईच्या ठिकाणी नोकरीला असलेले बहुतांश तरुण हे गावी परतले. अशावेळी ज्यांच्याकडे शेती होती, त्यांनी हा व्यवसाय अंगीकारला व समाधानाने कोरोनाच्या तीव्रतेशी सामना केला. त्यामुळे वधुमंडळीकडून किती मिळवतो, यापेक्षा शेती आहे की नाही, हा विषय प्राधान्याचा झाला आहे. मुलींबाबतही तीच गोष्ट. आधी कुटुंबवत्सल हा गुण आवर्जून पाहिला जात असे. तथापि, वाढत्या महागाईशी ‘ॲडजस्ट’ होण्यासाठी संसार नेटका चालविण्यासोबतच एखादा हुनर आहे का, हेही पाहिले जात आहे. स्त्रीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या महिला वर्गाच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह आहे. कमावत्या मुलीकडे रूप नसले तरी संसार सुखाचा होईल, याची हमी मध्यस्थ मंडळींकडून वरपक्षाला देण्यात येते. -----------------
मुलांपेक्षा वधुपक्षाच्या अपेक्षा बदलल्या आहेत. पूर्वी खासगी असो वा शासकीय नोकरी, पगाराच्या आकड्यावर लक्ष ठेवून वधुपक्षाकडून होकार मिळत असे. मात्र, कोरोनाकाळापासून मुलाकडे शेती आहे की नाही, हे आवर्जून विचारले जाते.
- अशोक उल्हे, वधू-वर सूचक मंडळ
------------------
मुलींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळवणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील मुली शहरात जाण्यास उत्सुक आहेत. तथापि, शहरातील मुली ग्रामीण भागात नांदावयास इच्छुक नसतात, हे बहुतांश पाहायला मिळत आहे.
- रामेश्वर मुंदे, वधू-वर सूचक मंडळ
---------------
या अपेक्षा वाढल्या
मुलगी आपल्या नजरेआड राहील एवढ्या लांब जायला नको.
मुलाकडे नोकरी हवी. याशिवाय पुरेशी शेतीदेखील हवी.
सासू-सासरे वा इतर नातेवाइकांची जास्त लुडबूड नको.
मुलगा वा मुलगी ही पुरेशी शिकलेली असावी व हनहुन्नरी असावी.
मुलगा वा मुलगी ही कमावती असावी.
---------------
या अपेक्षा झाल्या कमी
मुलगी ही खटल्यातील अर्थात कुटुंबवत्सल असावी.
मुलाला अजिबात व्यसन नको.
मुलाकडे मोठे कुटुंब. अर्थात कुटुंबाचे मोठे पाठबळ असावे.
कमावती असल्यास मुलीचे देखणेपण ही बाब गौण ठरली आहे.
--------------------