कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:00+5:302021-05-25T04:14:00+5:30
अमरावती : कोरोना संर्सगामुळे दोन वर्षांत उन्हाळ्याच्या काळात सतत संचारबंदी असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. विविध आजारांचे रुग्णदेखील घरीच ...
अमरावती : कोरोना संर्सगामुळे दोन वर्षांत उन्हाळ्याच्या काळात सतत संचारबंदी असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. विविध आजारांचे रुग्णदेखील घरीच असल्यामुळे या दोन्ही वर्षांत उष्माघातामुळे एकाही नागरिकांचा बळी गेला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
दरवर्षी मार्च महिन्यापासून दिवसाच्या तापमानात वाढ व्हायला सुरुवात होते व आरोग्य विभागाद्वारा उन्हापासून स्वत:ला कसे जपावे, याच्या टिप्स दिल्या जातात. गावापर्यंत जनजागृती केली जाते. उन्हाळ्याची दाहकता साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात अधिक असते व जिल्हा सामान्य रुग्णालयात दरवर्षी उष्माघात कक्ष तयार केला जातो. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आदी रुग्णालयांत उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपाय करावे, याविषयीचे मार्गदर्शन केले जातात. मात्र, यंदा तापमान ४० अंशांवर गेल्यानंतरही उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला नाही. २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात संचारबंदी असल्याने सकाळी ११ वाजतापासून रस्ते शुकशुकाट दिसून येतात. नागरिक देखील विनाकारण घराबाहेर पडत नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून जिल्ह्यात उष्माघाताचा बळी गेलेला नाही.
बॉक्स
ऊन वाढले तरी...
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ४० ते ४२ अंशापर्यंत व मे महिन्यात यापूर्वी ४६ अंशांपर्यंत तापमान गेलेले आहे. मात्र, यंदा हवामान बदलामुळे उन्हाची दाहकता वाढलीच नाही. ४२ अंशांवर तापमान गेलेच नाही. त्यामुळे उष्माघाताच्या घटना झालेल्या नाहीत. ऊन लागल्यास अनेकजन घरगुती उपायांवरही भर देत असल्याचे दिसून आले.
बॉक्स
उन्हाळा घरातच !
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली, ती अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात २२ फेब्रुवारीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली, ती कमी-अधिक प्रमाणात आताही सुरूच आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंतच घराबाहेर पडण्याची मुभा असल्याने नागरिक ११ च्या आत घरात आहेत.
कोट
संचारबंदी व कोरोना संसर्गात्या भीतीने नागरिक शक्यतोवर दुपारी घराबाहेर पडतच नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून उष्माघाताचे रुग्ण दिसून आलेले नाही.
- डॉ श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक
पाईंटर
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
२०१९ : ०५
२०२० : ००
२०२१ : ००