कोरोनाने राज्यातील भ्रष्टाचारही आणला नियंत्रणात; दोन महिन्यांत फक्त १३ ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 06:22 PM2020-05-18T18:22:48+5:302020-05-18T18:24:24+5:30
कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी एप्रिल महिन्यात सात आणि मे महिन्यात १३ तारखेपर्यंत सहा ट्रॅप यशस्वी झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फक्त पाच ते १० टक्केच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. नागरिकांचा फारसा संपर्क अधिकाऱ्यांशी या दिवसांत आलेला नाही. नागरिक घरातच असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी आणि परिणामी शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला आहे.
गतवर्षी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यांत ५८ ट्रॅपमध्ये शासकीय कार्यालयांशी संबंधित ७७ जण अडकले होते. मे महिन्यात ३५ सापळ्यांमध्ये ४५ जण अडकले होेते. लॉकडाऊनपूर्वी मार्च २०२० मध्ये ५८ ट्रॅपमध्ये ८६ जण अडकल्याची माहिती एसीबीच्या अहवालात नमूद आहे. मात्र, कोरोनाने गत दोन महिन्यांत अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचखोरीची संधीच दिली नाही. वर्षभर कारवाईत व्यस्त राहणाऱ्या राज्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांवरील ताणही यानिमित्त कमी झाला आहे.
पाच महिन्यांत २११ सापळे
राज्यातील विविध जिल्ह्यांतील विविध विभागांत एसीबीने केलेल्या कारवाईत पाच महिन्यांत २११ सापळे यशस्वी झाले असून, २९४ आरोपी निष्पन्न झाले. गत वर्षी पाच महिन्यांत ३२९ सापळ्यांमध्ये ४३५ जण अडकले होते. यंदा जानेवारी महिन्यांत ६८, फेब्रुवारीमध्ये ७२, मार्चमध्ये ५८, एप्रिलमध्ये सात आणि मे महिन्यांत सहा सापळे एसीबीने टाकले.