पुन्हा कोरोना ‘ब्लास्ट’; बुधवारी ३५९ ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:50+5:302021-02-11T04:14:50+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ३५९ संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. त्यामुळे नवीन वर्षात ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ३५९ संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. त्यामुळे नवीन वर्षात कोरोनाचा ‘ब्लास्ट’ ठरला आहे. कोरोना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात येत नाही. रविवारी केंद्रीय आरोग्य पथकाच्या दौऱ्यानंतरही काहीच सुधारणा नाही, असे चित्र आहे. गत १० दिवसांत २ हजार १९ संक्रमित रूग्ण आढळले आहे.
१ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या दरम्यान दरदिवशी कोरोना संक्रमितांची संख्या वाढती आहे. त्रिसूत्रीचे पालन करा, एवढ्यावरच प्रशासनाची जनजागृती सुरू आहे. मात्र, नागरीकांना कर्तव्याची जाणीव आणि कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, असा जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरू आहे. कोरोना लस आली नि प्रशासन सुसाट झाले, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वागणे आहे. राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग कायम असून, यात अमरावती जिल्हा आघाडीवर असताना प्रशासन नेमके काय करीत आहे, हे कळू शकत नाही. संक्रमित रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढत आहे. नवीन वर्षात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययाेजना केल्या नाहीत. केवळ कागदोपत्री आढावा, बैठकी, अहवाल इतकीच प्रशासकीय खानापूर्ती सुरू आहे. आतापर्यंत २३ हजार ८३५ संक्रमितांची संख्या आणि ४२७ जणांचा बळी गेले असताना जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर का नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------------
१० रुग्णालयात उपचाराची सुविधा
संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने १० रूग्णालयांची सुविधा केली आहे. यात अंबादेवी दवाखाना, ॲक्झाॅन हाॅस्पिटल,बेस्ट हॉस्पिटल, दयासागर दवाखाना, नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर सेंटर, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय दवाखाना, हिल टॉप कोविड हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अचलपूर ट्रामा केअर सेंटर, अमरावती येथील महावीर हॉस्पिटलचा समावेश आहे.
--------------------
चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणातील २० पथके आहे कुठे?
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सोमवारी वार्षिक नियोजन आढावा बैठकीला येण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात २० पथके जाहीर केले. मात्र, उपमुख्यमंत्री मुंबईला परत जाताच ना पथक, ना कारवाई, असा बेफिकीरी कारभार सुरू आहे. केवळ पथके गठित झाल्याचे जाहीर करून जिल्हा प्रशासनाने तूर्त वेळ मारून नेली, हे आता स्पष्ट होते.
---------------------
१ ते १० फेब्रवारी कोरोना रुग्ण आलेख
१ फेब्रुवारी-------------------- ९२
२ फेब्रुवारी-------------------- ११८
३ फेब्रुवारी-------------------- १७९
४ फेब्रुवारी-------------------- १५८
५ फेब्रुवारी-------------------- २३३
६ फेब्रुवारी-------------------- २७०
७ फेब्रुवारी-------------------- १९२
८ फेब्रुवारी-------------------- २३५
९ फेब्रुवारी-------------------- १८३
१० फेब्रुवारी-------------------- ३५९