अमरावतीमध्ये कोरोना ब्लास्ट, रोज ४०० क्राॅस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:22 AM2021-02-18T04:22:28+5:302021-02-18T04:22:28+5:30
अमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. फेब्रुवारीच्या १७ दिवसांत ४,७४७ कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर २४ रुग्णांचा ...
अमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. फेब्रुवारीच्या १७ दिवसांत ४,७४७ कोरोनाग्रस्तांची भर पडली, तर २४ रुग्णांचा बळी गेलेला आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे ११ महिन्यांत २७,७२६ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर ४४२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन दिवसांत १४३० कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे.
वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन केवळ बैठकांचा रतीब घालत आहे. कुठलाही ठोस निर्णय यामधून झालेला नाही. महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार क्राॅस झालेली आहे. महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांनी यंत्रणांचा आढावा घेतला व पथके कामी लावली आहेत. मंगल कार्यालयांत नियमांना तिलांजली देण्यात येत असल्याने दररोज कारवाया केल्या जात आहेत.
बॉक्स
शाळा बंद, धार्मिक स्थळे सुरू
जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते नववीच्या शाळांना २८ फेब्रुवारीपर्यंत बंदचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बजावले आहेत. देवस्थान, धार्मिक स्थळांवर नियमांना फाटा आहेच. जिल्ह्यातील यात्रा, मेळावे, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकांना मनाई आहे. निवडणुका मात्र सुरूच आहेत.
बॉक्स
तीन दिवसांत १,४३० पॉझिटिव्ह
जिल्ह्यात तीन दिवसांत कोरोनाचे रोज नवे उच्चांक स्थापित होत आहे. १५ फेब्रुवारीला ४४९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. १६ ला ४८५ व आता १७ तारखेला ४९८ रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.