देवगावमध्ये कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवशी ३५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:01+5:302021-05-24T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : अचलपूर पंचायत समितींतर्गत देवगाव येथे २२ मे रोजी एकाच दिवशी ३५ रुग्णांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर पंचायत समितींतर्गत देवगाव येथे २२ मे रोजी एकाच दिवशी ३५ रुग्णांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, देवगावमधील कोरोना संक्रमितांची संख्या शंभरच्यावर पोहोचली आहे.
देवगावमध्ये आढळलेल्या या ३५ कोरोना रुग्णांपैकी २८ रुग्णांना बुरडघाट येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित आठ रुग्णांनी गृह अलगीकरण मागितले आहे. मात्र, परिस्थिती बघता आणि बदललेल्या म्युटन्टची आक्रमकता बघता प्रशासनाने त्यांना गृह अलगीकरणाची परवानगी नाकारली आहे. देवगावमध्ये कोरोनाबाधित ‘त्या’ ४३ कुटुंबांमधील हे नवे ३५ कोरोना रुग्ण आहेत. १८ मे रोजी देवगाव येथे कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले होते. त्यात १५३ जणांची तपासणी करण्यात आली होती, यातील ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना काळात उपचारादरम्यान देवगावातील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. देवगावमध्ये लहान मुलांनाही कोरोनाने ग्रासले आहे. स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क असून, अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगावला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.