कोरोना ब्लास्ट, शनिवारी पुन्हा १९९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:50+5:302021-02-07T04:12:50+5:30
अमरावती : जिल्ह्यात दहा दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. शनिवारी पुन्हा १९९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने २२,८६६ ...
अमरावती : जिल्ह्यात दहा दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. शनिवारी पुन्हा १९९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने २२,८६६ वर पोहोचली आहे. या कालावधीत आठ दिवसांत १,१०७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह चाचण्यांची संख्या व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात मास्क वापर व दक्षतेबाबतची मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले. आरोग्य यंत्रणा, महापालिका व चाचणी प्रयोगशाळा आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेबाबत जनजागृती करताना दंडात्मक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परिस्थिती तपासूनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बॉक्स
सोमवारपासून पुन्हा मोहीम
आयसीएमआर पोर्टलवर अचूक नोंदी करण्याचे निर्देश दिले. संशयित व्यक्तींच्या तपासणी करताना आरटीपीसीआर चाचणी करावी. आरोग्य यंत्रणेनेही उपचार सुविधांची तजवीज ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.
बॉक्स
असे वाढले कोरोना रुग्ण
जिल्ह्यात ३१ जानेवारीला १२८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर १ फेब्रुवारीला ९२, २ फेब्रुवारीला ११८, ३ फेब्रुवारीला १७९, ४ फेब्रुवारीला १५८, ५ फेब्रुवारीला २३३ व ६ फेब्रुवारीला १९९ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.