कोरोना ब्लास्ट, ग्रामीणमध्ये ११० गावे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:13 AM2021-05-06T04:13:09+5:302021-05-06T04:13:09+5:30

अमरावती : महापालिका क्षेत्रात वर्षभर धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना संसर्गाची वक्रदृष्टी आता ग्रामीण भागाकडे वळली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत तब्बल ...

Corona Blast, seals 110 villages in rural areas | कोरोना ब्लास्ट, ग्रामीणमध्ये ११० गावे सील

कोरोना ब्लास्ट, ग्रामीणमध्ये ११० गावे सील

Next

अमरावती : महापालिका क्षेत्रात वर्षभर धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना संसर्गाची वक्रदृष्टी आता ग्रामीण भागाकडे वळली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत तब्बल ३१,४१३ रुग्ण व ५२१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. मंगळवारी जिल्ह्यात १,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, यात महापालिका क्षेत्रातील २४९ व ग्रामीणमधील ९७४ जणांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांचे प्रमाण सध्या ८७ टक्के आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील हॉटस्पॉट असणारी ११० गावे सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

या भागातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी आणखी काही गावे सील करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, बीडीओ, तालुका वैद्यकीय अधिकारी याची अंंमलबजावणी करीत आहे. जिल्हा सीमेलगतची काही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात कोरोना केअर सेंटर उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

ग्रामीणमध्ये संबादबंदीचे आदेश नावालाच आहे. जीवनावश्यक वगळता अन्य दुकानेही उघडली जात असताना स्थानिक प्रशासनासह पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आलेले आहे. याशिवाय जिल्हाबंदी नावालाच आहे. कुठेही अटकाव होत नसल्याने, ग्रामीण यंत्रणा करते तरी काय, हा नागरिकांचा सवाल आहे.

बॉक्स

ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट

सध्या वरूड ४,८०८, अचलपूर ४,५७६, मोर्शी २,६२०, अंजनगाव सुर्जी २,४८२ व तिवसा २,३९१ रुग्णसंख्या असणारी तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. याशिवाय अमरावती १,७४३, चांदूर रेल्वे १,८४१, चांदूर बाजार १,८३१, धारणी १,८८२, दर्यापूर १,६९३, धामणगाव १,९७२ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १,५७४ रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत भातकुली १,०५२ व चिखलदरा ९४८ या तालुक्यात संसर्ग कमी आहे.

बॉक्स

ग्रामीणमध्ये ५२१ संक्रमितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत १,०२५ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी ५२१ मृत्यू जिल्हा ग्रामीणमधील आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक (२ टक्क्यांपर्यंत) आहे. यामध्ये सर्वाधिक ८७ मृत्यू अचलपूर व ८५ वरूड तालुक्यात झालेले आहे. चाचण्यांना उशीर व लक्षणे अंगावर काढणे याशिवाय कोमार्बिडीटी आजार हे संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

नागपूर, एमपीच्या सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये उद्रेक

जिल्हा सीमेलगतच्या नागपूर, वर्धा मध्यप्रदेशात कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेला आहे. तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी येत आहेत. यासोबतच त्यांचे नातेवाईकदेखील जिल्ह्यात दाखल झाल्याने संसर्ग वाढला आहे. यामध्ये मध्यप्रदेश सीमेलगतचे अचलपूर्, धारणी अंजनगाच सुर्जी व चांदूरबाजार त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा सीमेलगतचे वरूड, मोर्शी, वर्धा सीमेलगतच्या तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव तालुक्यात ब्लास्ट झालेला आहे.

बॉक्स

पीएचसीमध्ये उभारणार कोरोना केअर सेंटर

ग्रामीणमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना केअर सेंटर उभारण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले आहेत. याठिकाणी ३० ऑक्सिजन बेड राहणार आहेत. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणार येणार आहे. यासह अन्य उपाययोजनांसाठी सीएसआर फंडातून पाच कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहे.

कोट

या आठवड्यात ग्रामीणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने ११० गावे कंटेनमेंट करून सील करण्यात आले. आता पीएचसीमध्येही कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी

पाईंटर (मंगळवारची स्थिती)

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त : ६९,५२७

ग्रामीणमध्ये पॉझिटिव्ह : ३१,४१३

जिल्ह्यात मृत्यू : १,०२५

ग्रामीणमध्ये मृत्यू : ५२१

जिल्ह्यात डिस्चार्ज :५९,५४१

ग्रामीणमध्ये संक्रमणमुक्त :२४,२३६

Web Title: Corona Blast, seals 110 villages in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.