तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट, वरुड शहर बनले हॉटस्पॉट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:14 AM2021-04-28T04:14:14+5:302021-04-28T04:14:14+5:30
वरुड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता नागरिकांच्या पथ्यावर पडत असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढतच असून, नागरिकसुद्धा सैराट होऊन ...
वरुड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता नागरिकांच्या पथ्यावर पडत असून, दिवसेंदिवस ही संख्या वाढतच असून, नागरिकसुद्धा सैराट होऊन रस्त्यावर अकारण फिरताना दिसून येत आहे. लॉकडाऊनचा शहरासह तालुक्यात फज्जा उडाला आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आवरणार तरी कोण ? हा प्रश्न आहे. गेल्या आठ दिवसात एकावरही कारवाही नाही. तालुक्यात सोमवारी आलेल्या कोरोना चाचणीच्या अहवालात १४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. हा मोठा ब्लास्ट आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती गंभीर होऊन ही परिस्थिती सावरण्यास प्रशासनाच्या काहीच उपाययोजना नसल्याचे सांगण्यात येते. अनेकांनी मृत्यूला कवटाळले असले तरी प्रशासनाकडे आकडेवारीच्या नोंदी नाहीत. वरुड तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, दिवसागणिक शेकडो चाचण्या केल्या जात आहेत. सोमवारी आलेल्या चाचणी अहवालात वरुड शहरात ६४, तर ग्रामीण भागात ८२ अशी आकडेवारी आहे. परंतु ही आकडेवारी तालुका प्रशासनाकडे येत नसल्याने चिंताजनक आहे. अनेकांनी मृत्यूला कवटाळले असले तरी याबाबत प्रशासनाकडे नोंदी नाही. तालुका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन करते तरी काय, हा प्रश्न आहे. यामध्ये वरुड ६४, शेंदुर्जनाघाट ८, बेनोडा ४, धनोडी १, भेमडी २, गाडेगाव ६, आमनेर १, सावंगी २, जरुड ९, बेसखेडा ३, सुरली ३, टेम्भूरखेडा ५, पेठ मांगरूळी ३, ढगा २, सावंगा १, चांदस ३, राजुरा बाजार ४, मांगरूळी ३, लोणी ३, पुसला २, नांदगाव २, वाढेगाव १, देऊतवाडा १, अमडापूर १, वाठोडा ४, करंजगाव १, माणिकपूर २, वडाळा १, बेनोडा १, जामगाव १, डवरगाव १ असे चाचणी अहवाल आहेत. यातील बहुतांश गृहविलगीकरणात ठेवले आहेत. काही रुग्णालयात दाखल झाले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु प्रशासन गंभीर नसून, प्रशासनच कोरोनाग्रस्त होत असल्याने अधिकरीसुद्धा धास्तावले असून, नागरिक मात्र सैराट झाले आहेत. राज्य शासनाचे आदेश पायदळी तुडविले जात आहेत. कुणाचे कुणावरही नियंत्रण राहिले नाही. कोरोना चाचणी केंद्र आणि लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला असतो. खासगी दवाखान्यातही हीच अवस्था आहे. गर्दीला पायबंद करणार तरी कोण, हा प्रश्न आहे. लोक विनामास्क अकारण सैराट होऊन भटकंती करीत असतात. तालुक्यात अनेकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. परंतु प्रशासनाकडे नोंदच नाही. अशा अवस्थेत प्रशासनानेसुद्धा हात टेकले आहेत. तालुक्याचा वाली कोण ? अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत. वरुड बनले कोरोनाचा हॉटस्पॉट ? एकाच दिवशी वरुडमध्ये ६४ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्याने चिंतेचा विषय आहे. यापूर्वी दिवसागणिक ४० ते ५० रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले. मात्र, लोकांनी लॉकडाऊनची वाट लावल्याने शहरात कोरोना आहे की नाही ? अशी परिस्थिती असून, वरुड शहर कोरोनाचे हॉटस्पॉट असताना कंटेन्मेंट झोन गायब आहे, तर गृह विलगीकरणातील कोरोनाग्रस्तांची तपासणीसुद्धा बंद आहे. कुठेही सॅनिटायझेशन होत नाही. केवळ वरिष्ठ अधिकारी येताच प्रशासनाची धावपळ सुरू होते. क्वारंटाईन सेंटर कधी सुरु होणार, की नियोजनाचा अभाव ? तालुक्यासाठी केवळ बेनोडा येथे क्वारंटाईन सेंटर सुरु असून, १५ ते २० रुग्ण असतात. मात्र, वरुड शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना शहरात एकही विलगीकरण केंद्र सुरु केले नाही किंवा ताब्यात घेतले नसल्याचे सांगण्यात येते. यावर उपाययोजनेबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाचा कहर हाताबाहेर गेल्यास नागरिकांनी जावे कुठे, हा प्रश्न आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोविड केअर सेंटर म्हणून सुरु करण्याकरिता १५ ते २० बेड टाकून ठेवले. मात्र, कर्मचारी वर्गाचे नियोजन नसल्याने भकास पडून आहे. नियोजनाचा अभाव असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सुरु असून, याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.