चांदूर बाजार तालुक्याला कोरोनाचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:44+5:302021-04-25T04:11:44+5:30

पान २ चे लिड सुमीत हरकुट चांदूर बाजार : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागातील रुग्णांची संख्या जास्त होती. ...

Corona to Chandur Bazar taluka! | चांदूर बाजार तालुक्याला कोरोनाचा विळखा!

चांदूर बाजार तालुक्याला कोरोनाचा विळखा!

googlenewsNext

पान २ चे लिड

सुमीत हरकुट

चांदूर बाजार : कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागातील रुग्णांची संख्या जास्त होती. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरासह ग्रामीण भागालाही मोठा विळखा घातला आहे. लक्षणांकडे केले जाणारे दुर्लक्ष तसेच काळजी घेतली न गेल्याने संसर्गाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक, आजार अंगावर काढत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

चांदूर बाजार शहराचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. परंतु, शहरातील कोरोनाग्रस्तांची चर्चा होते. मात्र, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थिती चिंताजनक होत चालली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचे संक्रमण अतिशय जलद होत आहे. ग्रामीण भागात खबरदारीच्या अभावामुळे संसर्ग वाढतच आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची अनाठायी भीती असल्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची स्थिती गंभीर होऊन मृत्यू ओढवत आहे.

तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माहितीनुसार, आजपर्यंत तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९६२ इतकी आहे. पैकी चांदूर बाजार शहरातील रुग्णसंख्या १९८ आहे, तर ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ७६४ आहे. तालुक्यातील एकूण ३० मृत्युसंख्येपैकी २८ मृत्यू ग्रामीण भागातील, तर फक्त दोन शहरातील आहेत. चांदूर बाजार शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अंदाजे ८० गावांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

नागरिकांमध्ये कोरोनाची भीती, अज्ञान, आजार अंगावर काढणे, तपासणीसाठी न जाणे यामुळे रुग्णांचे निदान व वेळीच विलगीकरण होत नाही. परिणामी प्रत्यक्ष लक्षणे दिसून येण्याअगोदरच अशा व्यक्तीकडून अनेक जण संसर्गित होतात. हे सर्व रोखण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामीण भागात कोरोनाविषयी जागृती करणे आवश्यक आहे.

तपासणी अहवाल उशिराने

तपासणी लवकरात लवकर करणे, प्राथमिक पातळीवर रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. हे सर्व केले, तरच प्रसार रोखता येईल. केवळ लाॅकडाऊन हा पर्याय नाही. विशेष म्हणजे, आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल पाच ते सहा दिवसांनंतर येत असल्याने तोपर्यंत संबंधित रुग्ण सर्वत्र वावरतो व अनेकांना संसर्गित करतो.

कोट १

गावपातळीवर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आजच्या कोरोना संकटाच्या वेळी छोट्यातली छोटी माहिती हे संकट टाळण्यासाठी आवश्यक ठरू शकते.

- धीरज स्थूल, तहसीलदार, चांदूर बाजार.

कोट २

कोरोनाची लक्षणे दिसताच ताबडतोब जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. आजार अंगावर काढू नका. घाबरू नका, सतर्क राहा. योग्य वेळी उपचार केल्याने कोरोना बरा होतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

- प्रफुल्ल भोरगडे, गटविकास अधिकारी

कोट ३

भिऊ नका, पुढे या. वेळीच उपचार करून घ्या. कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. नागरिकांनी संवेदनशीलपणे आरोग्य यंत्रणेच्या, मार्गदर्शन सूचनांचे अवलंबन करावा.

- डॉ. ज्योत्सना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार

Web Title: Corona to Chandur Bazar taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.