कोरोना डेंजर झोन, ३१ तासांत २१ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:59+5:302021-02-24T04:14:59+5:30
अमरावती : कोरोना संसर्गात सध्या मृत्यूचे तांडव जिल्ह्यात सुरूच आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरातील कोविड हाॅस्पिटलमध्ये ३१ तासांत ...
अमरावती : कोरोना संसर्गात सध्या मृत्यूचे तांडव जिल्ह्यात सुरूच आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरातील कोविड हाॅस्पिटलमध्ये ३१ तासांत २१ मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्याला हादरा बसला आहे. सीएस कार्यालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत संक्रमितांचे मृतांची संख्या ४७१ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या संक्रमिताच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतरच्या कालावधीत पहिल्यांदा मंगळवारी सर्वाधिक ९२६ कोरोनाग्रस्त व दीड दिवसात सर्वाधिक २१ मृत्यूची नोंद झालेली आहे. महापालिकेच्या मंगळवारी दुपारी १२ पर्यंतच्या अहवालात १३ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सायंकाळी ७ वाजताच्या अहवालात ८ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गंभीर रुग्ण हे शहरातील खासगी व शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक १० मृत्यू जिल्हा कोविड रुग्णालयात झाल्याची नोंद अहवालात आहे.
कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण फेब्रुवारी महिन्यात नोंद होत असताना कोरोना बळीची वाढती संख्या आगामी काळासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सीएस कार्यालयाच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्याच्या २३ दिवसांत ५३ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे.
बॉक्स
दोन अहवालानुसार हॉस्पिटलनिहाय मृत्यूसंख्या
* महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अहवालानुसार मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या नोंदीनुसार आरआरएसएचमध्ये सहा, कंकरानीया हॉस्पिटलमध्ये एक व बेस्ट हॉस्पिटलमध्ये एका संक्रमिताचा मृत्यू झाला.
* मंगळवारी दुपारी १२ च्या अहवालानुसार आरआरएसएचमध्ये ४, राव हॉस्पिटलमध्ये १, एक्झाॅनमध्ये १, बारब्दे हॉस्पिटल १, पीडीएमएमसीमध्ये चार, गेटलाईफमध्ये १, तर ककरानिया हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.