एसआरपीएफ कॅम्पमधून कोरोना हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:44+5:302021-07-01T04:10:44+5:30
लसीकरण पूर्ण, पहिल्या-दुसऱ्या लाटेत एकही बळी नाही, नियोजनाचे यश अमरावती : सुमारे ३० एकरात विस्तारलेल्या राज्य राखी पोलीस दल ...
लसीकरण पूर्ण, पहिल्या-दुसऱ्या लाटेत एकही बळी नाही, नियोजनाचे यश
अमरावती : सुमारे ३० एकरात विस्तारलेल्या राज्य राखी पोलीस दल (एसआरपीएफ) कॅम्प परिसरात कोरोनाला हातपाय पसरायला जागाच मिळाली नाही. विशेष म्हणजे, सुरुवातीला उदासीनता व आता लसीची मारामार अशी स्थिती सर्वत्र, दिसत असताना एसआरपीएफ कॅम्पमध्ये दुसऱ्या डोसचे ९० टक्क्यांवर लसीकरण झाले आहे. समादेशक हर्ष पोदार यांच्या नेतृत्वात कुठलीही जीवितहानी न होता कोरोना संसर्गाला या परिसरातून परतविण्यात आले.
राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत असलेल्या कॅम्पमध्ये ११०० जवानांचे कुटुंब मिळून चार हजारांवर आबालवृद्धांचे वास्तव्य आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी येथील जवानांना राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले होते. कॅम्पमध्ये परतल्यानंतर त्यांची वेळोवेळी कोरोना चाचणी व योग्य औषधोपचाराची सुविधा त्यांना उपलब्ध करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट नागरिकांवर कोसळत असताना एसआरपीएफ कॅम्पमध्ये फेब्रुवारीमध्येच पहिल्या डोसचे १०० टक्के व दुसऱ्या डोसचे ९० टक्क्यांवर लसीकरण मार्चमध्येच करण्यात आले. लसीकरण व वेळोवेळी होणाऱ्या तपासणीच्या बळावर गंभीर कोरोनाग्रस्त वा कुणाचा मृत्यू एसआरपीएफ कॅम्प परिसरात झाला नाही. विशेष म्हणजे, ऑक्सिजन तुटवड्याची पूर्वकल्पना मिळाल्याने एसआरपीएफ कॅम्पमध्ये मार्चमध्येच दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दाखल करण्यात आले होते.
-----------------
वडाळीतील पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढली
एसआरपीएफ कॅम्पच्या पुढ्यात असलेल्या वडाळी तलाव यंदा बंद करून त्याचे खोलीकरण एसआरपीएफच्या नेतृत्वात करण्यात आले. त्याच्या परिणामी हिवाळ्यात पहिल्यांदाच विदेशातून विणीच्या हंगामात येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या वाढल्याचे निरीक्षण पक्षिप्रेमींनी नोंदविले.
--------------------
कोरोना संक्रमणाची भयावहता ओळखून वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या. लसीकरणात मोठा टप्पा गाठला आहे. याद्वारे कोरोनाला रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
- हर्ष पोदार, समादेशक एसआरपीएफ, अमरावती