शेतकरी आत्महत्यांवर कोरोना वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:12 AM2021-02-08T04:12:25+5:302021-02-08T04:12:25+5:30
गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात अस्मानी अन् सुलतानी संकटामुळे वर्षभरात २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यावर कोरोना संसर्ग भारी पडला ...
गजानन मोहोड
अमरावती : जिल्ह्यात अस्मानी अन् सुलतानी संकटामुळे वर्षभरात २९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यावर कोरोना संसर्ग भारी पडला आहे. १० महिन्यांतील या कोरोना संकटामुळे तब्बल ४२३ नागरिकांचे बळी गेले. या दोन्ही प्रकारांत ७९८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
दोन वर्षांपासून राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत असताना या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही ठोस पावले उचलली गेलेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, शेतमालास भाव नाही, यातून वाढणारे बँकाचे व सावकारांचे कर्ज, या कर्जाच्या वसुलीसाठी सततचा तगादा यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य भारी पडत आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व जगावे कसे, या विवंचनेतून शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे. या दृष्टचक्रात अडकलेल्या २९५ शेतकऱ्यांनी २०२० मध्ये मृत्यूचा घोट घेतल्याचे वास्तव आहे. अशाप्रकारे शेतकऱ्याने सुटका करुन घेतली असली त्याच्या पश्चात उर्वरित कुटुंबाच्या समस्या वाढल्या आहेत. कर्जाचा बोजा वारसाच्या नावे चढला, तर शासनाकडून केवळ एक लाखाची मदत मिळाली. यामध्येही ३० हजार रोख व ७० हजारांचा बाँड असे स्वरूप आहे. सन २००५ पासून या मदतीत अजूनही भरीव वाढ झालेली नाही.
एप्रिल महिन्यापासून कोरोना संकटाची भर यात पडली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत ४२३ संक्रमित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही प्रकारांत ७९८ नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणा थिट्या पडत असल्यामुळेच संकटे नागरिकांच्या जिवावर उठली आहेत.
बॉक्स
अर्धेअधिक प्रकरणे मदतीपासून अपात्र
जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण २९५ शेतकरी आत्महत्या झाल्या. यापैकी १४० प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. ८१ प्रकरणे अपात्र व ६६ प्रकरणे चौकशीसाठी प्रशासनाचे लालफीतशाहीत अडकली आहेत.
बॉक्स
बैठकांसाठी जिल्हा प्रशासन गंभीर नाही
शेतकरी आत्महत्यांची प्रकरणांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. या समितीमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसोबत प्रशासनाचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या समितीची बैठक चार-चार महिने होत नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात व वारसाला शासकीय मदतीस विलंब होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
-------------------मृत्यूची जोडगोळी अशी
शेतकरी आत्महत्या कोरोना बळी
जानेवारी : २४ ००
फेब्रुवारी : २७ ००
मार्च : १४ ००
एप्रिल : १३ ०७
मे : २९ ०८
जून : २९ ०९
जुलै : ३१ ३७
ऑगस्ट : २५ ७०
सप्टेंबर : ३० १५६
ऑक्टोबर : ३१ ७७
नोव्हेंबर : २५ १३
डिसेंबर : १७ ०४
बॉक्स
कॉमर्बिड आजारानेही कोरोना बळी
जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत जे बळी गेले आहेत, त्यामध्ये ८० टक्के रुग्णांना बीपी, शुगर, हृदयरोगासारखे अन्य आजार असल्याचे आरोग्य विभागाचे ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले. याशिवाय अंगावर लक्षणे काढणे, उशिरा उपचार आदी कारणांमुळेही कोरोनाचे मृत्युसंंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते.