कोरोना इफेक्ट; अमरावती जिल्ह्यातील बहिरमची ऐतिहासिक यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 09:41 PM2020-11-30T21:41:48+5:302020-11-30T21:42:27+5:30
Amravati News Bahirambaba विदर्भातील सुप्रसिद्ध तसेच सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भातील सुप्रसिद्ध तसेच सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहेत. त्यामुळे चांदूर बाजार पंचायत समितीमार्फत होणाऱ्या प्लॉटचे लिलावसुद्धा होणार नसल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रफुल भोरगडे यांनी दिली.
हजारो कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या बहिरामबाबांच्या दर्शनाला दरवर्षी लाखो लोक येतात. या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या यात्रेत सुरुवातीपासून शेतीपयोगी साहित्याची विक्री केली जाते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी या यात्रेतील मुक्या जनावारांचा बळी देण्याची प्रथा बंद झाली. नंतर या यात्रेतील तमाशा फड बंद करण्यात आले. या यात्रेला शासकीय यात्रेचा दर्जा प्राप्त करून दिला गेला. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शासनाने ही ऐतिहासिक बहिरम यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बहिरम यात्रेची सुरुवात दरवर्षी २० डिसेंबरपासून होते. त्या दृष्टीने यात्रेत लागणाऱ्या दुकानांच्या जागेचा लिलाव दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. चांदूर बाजार पंचायत समितीला त्यातून दरवर्षी १० ते १२ लाखांचे उत्पन्नसुद्धा होते. परंतु, यात्रा रद्द झाल्याने या वर्षी स्थानिक पंचायत समितीला त्या उत्पन्नापासून मुकावे लागणार आहे.
रोजगार, व्यवसायालाही फटका
यात्रेतील दुकानांच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब कुटुंबांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, दरवर्षी होणारी कोट्यावधीची उलाढाल कोरोनामुळे थांबणार आहे. तेथे गर्दी होऊ न देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढले तसेच पंचायत समिती स्तरावर कडक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे मंदिरात २० डिसेंबर रोजी होमहवन व पूजन केले जाईल. मात्र, मंदिर परिसरात केवळ संस्थानचे अध्यक्ष व मर्यादित विश्वस्तांची उपस्थिती राहणार आहे तसेच भाविकांना मंदिरात प्रवेश न देता भैरवनाथाचे केवळ मुखदर्शन घेता येणार आहे.
- किशोर ठाकरे, विश्वस्त, बहिरमबाबा संस्थान