वेतनासाठी कोरोनायोद्धा उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:17 AM2021-09-07T04:17:10+5:302021-09-07T04:17:10+5:30
जिल्हा परिषदेसमोर आंदोलन; तात्काळ वेतन देण्याची मागणी अमरावती : जिल्हा परिषद सर्व संवर्गनिहाय आरोग्य कर्मचारी गत दीड वर्षापासून कोरोनाकाळात ...
जिल्हा परिषदेसमोर आंदोलन; तात्काळ वेतन देण्याची मागणी
अमरावती : जिल्हा परिषद सर्व संवर्गनिहाय आरोग्य कर्मचारी गत दीड वर्षापासून कोरोनाकाळात अहोरात्र नियमितपणे आरोग्य सेवा गावोगावी जाऊन देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १५ ते २५ दरम्यान होत असते. आता मात्र अजूनपर्यंतही वेतन मिळाले नाही. त्यामुळे सोमवारी हेल्थ एम्प्लाॅईज फेडरेशनच्या नेतृत्वात शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गत महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांंना आर्थिक अडचणीमुळे विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने करावे, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु, ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्याकडे सादर केले. यावेळी हेल्थ एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदे, विनोद डोंगरे, रजनीकांत श्रीवास्तव, अशोक पोकळे, बाबूलाल सिरसाट, सुभाष चव्हाण, विनोद पारोदे, गोकुळ बांबल, राजेश पणजकर, अतुल नांदूरकर, कुलदीप रुद्रकार, अर्चना धुर्वे, गंगा सूर्यवंशी, सुजाता रोडगे, सुनंदा राऊत, लक्ष्मी बनसोड, प्राची घोरमोडे, संगीता ढेवले, गायत्री साऊरकर, स्वाती अळसपुरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.