कोरोनाची पुरुषांवर सर्वाधिक वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:34+5:302021-04-15T04:12:34+5:30
अमरावती : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७२६ रुग्णांचे मृत्यू झाले. यात ५३८ पुरुष व १८८ महिलांचा समावेश आहे. ५० ...
अमरावती : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७२६ रुग्णांचे मृत्यू झाले. यात ५३८ पुरुष व १८८ महिलांचा समावेश आहे. ५० वर्षांवरील रुग्णांवर कोरोनाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून आले. बाधितांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक ५८२ मृत्यू हे ५० वर्षांवरील नागरिकांचे आहे. यामध्येही पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले.
जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेला पहिला कोरोनाग्रस्त हा ‘होमडेथ’ होता. तेव्हापासून कोरोना संसर्गात मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये १० मृत्यू झालेत. यात ८ केसेस या ‘होमडेथ’ होत्या. त्यानंतर जिल्ह्यात होमडेथ व्यक्तींचे स्वॅब घेणे बंद केले. त्याऐवजी त्या परिवारातील हायरिस्कमधील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा त्यावेळी ७ ते ८ असा असल्याने अमरावती जिल्हा राज्यात सर्वाधिक मृत्यूदराचा जिल्हा ठरला होता.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कोमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील ६ महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वात कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत. जिल्ह्यात ६० ते ७० वर्षांचे नागरिकांवरच कोरोनाची अधिक वक्रदृष्टी का? याबाबतचे गंभीरतेने विचार होऊन उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.
बॉक्स
६१ ते ७० वयोगटात मृतांची संख्या अधिक
जिल्ह्यात १३ एप्रिलपर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंमध्ये ५० ते ६० वयोगटात आतापर्यंत १७५ तर ६१ ते ७० वयोगटात २०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. या व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी जास्त राहतात व बाहेच्या व्यक्तींच्या जास्त संपर्कात राहत असल्याने त्यांना संसर्ग अधिक होतो व अंगावर लक्षणे काढणे देखील महागात पडत असल्याचे दिसून येते.
बॉक्स
रोग प्रतिकारशक्ती महत्त्वाची
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये त्यांची रोग प्रतिकारशक्तीचाही महत्त्वाचा रोल आहे. रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोरोना संसर्गाचे गंभीर परिणाम होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. यासाठी असलेली विविध उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याने आजार अंगलट येतात.
बॉक्स
१८९ महिलांचेही मृत्यू
कोरोना संसर्गाचे काळात १८९ महिलांचे मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत. यामध्ये देखील ५० ते ७० वयोगटातले अधिक रुग्ण आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार ५१ ते ६० वयोगटात ५६ तर ६१ ते ७० या वयोगटातील ५५ महिलांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. अंगावर दुखणे काढणे व कोर्माबिटी आजार व रोग प्रतिकारशक्तींत कमी ही प्रमुख कारणे आहेत.
बॉक्स
मार्च महिन्यात सर्वाधिक मृत्य
जिल्ह्यात यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाला. त्यावेळी महिनाभरात ७,७१३ पॉझिटिव्हची नोंद व १५४ मृत्यू झाले. मात्र, मार्च २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत १३,५१८ पॉझिटिव्हची नोंद व १६४ जणांचा बळी गेलेला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेनचा संसर्ग अधिक असल्याने जिल्ह्यात उद्रेक झाला होता. काही दिवस माघारत नाही तोच पुन्हा संसर्ग वाढायला लागला आहे.
कोट
पुरुष कामानिमित्त बाहेर असताना त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे पॉझिटिव्हमध्ये पुरुषाचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अंगावर दुखणे काढणे, रोग प्रतिकारशक्तीत कमी व कोमार्बिड आजारांमुळे संसर्गात मृत्यूचे प्रमाण वाढते.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक