अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर; एकूण संख्या १७५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 04:21 PM2020-05-25T16:21:05+5:302020-05-25T16:21:29+5:30
अमरावतीमध्ये सोमवारी दुपारपर्यंत आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून त्यात तीन महिन्याच्या मुलासह तीन वर्षांच्या मुलीचा यात समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीमध्ये सोमवारी दुपारपर्यंत आणखी ११ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून त्यात तीन महिन्याच्या मुलासह तीन वर्षांच्या मुलीचा यात समावेश आहे. दोन डॉक्टरांसह पोलीसपत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाची दहशत वाढत आहे.
रविवारी शहराला कोरोनाने मोठा हादरा दिला होता. येथील हबीबनगर कंटेनमेंटमधील ३१ वर्षीय व्यक्ती २१ मे रोजी कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन करून थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. त्याचा अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यामध्ये पाच वर्षीय चिमुकली, ३० व ६५ वर्षीय महिला व ३३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या परिवाराच्या संपकार्तील २२ व ५४ वर्षीय पुरुष व ३६ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरिक्त २१ मे रोजी पॉझिटिव्ह अलहिलाल कॉलनीतील एका व्यक्तीच्या संपकार्तील ११ वर्षीय मुलगी तसेच शिवनगरात २१ व २२ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपकार्तील शिवनगरातील ३० वर्षीय युवक व ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. या सर्वांना कोविड रुग्णालयातील दुसऱ्या माळ्यावरील कक्षात हलविले आहे.
कोविड रुग्णालयातील ४५ वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवसांची सेवा आटोपल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येते. या महिलेचा थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविला होता. याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाल्याने कोविड रुग्णालयातील चौथा वॉरिअर संक्रमित झाला आहे.
आरोग्य विभागाद्वारे या संक्रमित रुग्णांची हिस्ट्री घेण्याचे काम सुरू आहे. बाधिताच्या घराकडील मार्ग बंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या भागात सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. हबीबनगर परिसर यापूर्वीच कंटेनमेट जाहीर केला असल्याने आशा व एएनएम व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे गृहभेटी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.