भातकुली तालुक्यातील चार गावे कोरोना हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:52+5:302021-05-01T04:12:52+5:30
टाकरखेडा संभु : ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना भातकुली तालुक्यातील भातकुली शहरासह कवठा बहाडे, जावरा व कानफोडी ...
टाकरखेडा संभु : ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना भातकुली तालुक्यातील भातकुली शहरासह कवठा बहाडे, जावरा व कानफोडी या गावांमध्ये अधिक रुग्ण आढळून आले आहेत,त्यामुळे ही गावे महसूल मंडळाने सील केली आहेत. या हॉटस्पॉट गावांना शुक्रवारी तहसीलदार नीता लबडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.
या गावात बाहेरच्या नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये आता कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, अशातच भातकुली तालुक्यातील भातकुली, कवठा बहाडे, जावरा व कानफोडी या चार गावांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, ज्या गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण असेल ते गाव सील करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्याने आज, शुक्रवारी सदर गावे सील करण्यासंदर्भातली कारवाई तहसीलदार नीता लबडे यांनी घटनास्थळी गावाला भेट देऊन केली. गावांच्या सीमेवर अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, या गावात बाहेरील नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच रुग्णांच्या सुविधा संदर्भातला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा यावेळी तहसीलदार यांनी घेतला.
बॉक्स
भातकुलीच्या सहकारी बँकेला दहा हजारांचा दंड
येथील सहकारी बँकेसमोर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्याने तहसीलदार नीता लबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बँकेला दहा हजाराचा दंड ठोठावला आहे, या बँकेसमोर नागरिकांनी कोणत्याच प्रकारची सोशल डिस्टन्सचे पालन केले नव्हते. तथा बँकेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसली नाही
त्यामुळे सदरचा दंड ठोठावण्यात आल्याचे तहसीलदार नीता लबडे यांनी सांगितले.