कोरोना संक्रमण; ६० दिवसात ६३ भागांमध्ये एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:18+5:30
जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही.
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात ३ एप्रिलला हाथीपुरा भागातून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ५३ भागांमध्ये पोहोचलां. जिल्हा ग्रामीणमध्येही १० भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. या ६० दिवसांत नव्या ६३ भागांमध्ये झालेले कोरोनाचे संक्रमण ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. रोज नव्या भागात कोरोना संक्रमितांची नोंद होत असल्याने आता समूह संक्रमणाची भीती निर्माण झालेली आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कुठून झाला, हे गुलदस्त्यात राहिले. त्यानंतर काही दिवस हैदरपुरा, कमेला ग्राऊंड, पाटीपुरा, तारखेड आदी भागांपुरतेच कोरोनाचे संक्रमण राहीले. पहिल्या २० दिवसांत १६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. यामध्ये पाच संक्रमितांची होम डेथ झाली, तर चार व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. या भागात कोरोनाचे ‘क्लस्टर हॉटस्पॉट’ तयार झाले. महापालिका प्रशासनाने कंटेनमेेंट झोन तयार केलेत. मात्र, अंमलबजावणी प्रभावी झालेली नसल्याने प्रादुर्भाव वाढताचा राहिला आहे. पोलीस यंत्रणेचे दुर्लक्षदेखील तेवढेच कारणीभूत ठरले. यानंतरच्या २० दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव २८ भागांत पोहोचला. यामध्ये शहरात २४ व ग्रामीणमध्ये चार भागांत ७४ संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मृत्यूचेही प्रमाण वाढले. पहिल्या ४० दिवसांत १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५६ व्यक्ती पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेत. यानंतर मात्र शहराच्या अन्य भागांतही मोठ्या प्रमाणात कोरोना शिरकाव झाला. आता तर मसानगंज, फ्रेझरपूरा, रतनगंज हे भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनल्याने प्रशासन, नागरिकांची चिंता वाढली आहे.
धक्कादायक; २० दिवसांत १७४ रुग्ण
अलिकडच्या २० दिवसांत जिल्ह्यात १७४ रुग्णांची नोंद झालेली आहे. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. त्याचसोबत आतापर्यंत ६० भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. रुग्णसंख्या वाढत असताना, बाधितांच्या मृत्यूचा दर कमी झाला. या कालावधीत दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर ७२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यात. आरोग्य मंत्रालयाद्वारा ९ मे रोजीच्या गाइड लाइनमुळे कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. लक्षणे नसल्यास दहा दिवसांत रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होत आहे. ही बाब दिलासा देणारी आहे.
काही कंटेनमेंट अलीकडे संक्रमित रुग्णाची नोंद नसल्याने निरस्त करण्यात आले. काही भागांमध्ये संक्रमितांची संख्या वाढती आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता तीन खासगी रुग्णालयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी